
मुंबई : लहानपणापासून शिवसेनेची वाटचाल बघत आलो आहे. त्यावेळी शिवसैनिक आंदोलन करत असत, तेव्हा पोलीस शिवसैनिकांना धमकी देत हे सगळं बंद कर आणि काँग्रेसमध्ये ये, नाही तर टाडा लावतो, असे म्हणत असत. आताही तीच परिस्थिती आहे. आता पोलिसांचा वापर टोळीतील लोकांसारखा होतोय आणि पक्ष फोडाफोडी केली जातेय, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
'मी पाहिलेला तीन दशकांतील थरार' या ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, शिवसेना खासदार संजय राऊत, माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, जर पोलिसांना फ्री हॅन्ड दिला तर, पोलीस चमत्कार करू शकतात. मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर तेव्हाही माझा विश्वास होता आणि आजही आहे. मात्र फ्री हॅन्ड न देता तुम्ही नको तिथे पोलिसांचा बंदोबस्त लावता. ज्यांना गरज नाही त्यांना संरक्षण दिले, ज्यांना टिपायला पाहिजे, ते मोकळे फिरतायत. गेले दोन दिवस पाण्यासाठी आपण जे आंदोलन केले, तिथे आंदोलने होऊ नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त होता.