
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच सुरु होणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु असून निवडणूक आयोगाच्या निकालावरही केस सुरु आहे. न्यायालयाने व्हीप लागू होणार नाही, असा आदेश दिला आहे. त्यामुळे व्हीपची भीती न बाळगता सर्वसामान्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडा, असे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना दिले.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चिन्ह आणि पक्षाचे नाव गमावले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू असून व्हीप लागू होणार की नाही, याबाबत असलेली भीती, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाआधी पक्षाच्या आमदारांची मातोश्री येथे बैठक घेतली. यावेळी ठाकरे गटाचे सर्व आमदार या बैठकीस उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होणार?, याचा विचार करू नका. तुम्ही मतदारसंघातील प्रश्न मांडा. मी कायदेशीर लढाईच बघतो, पण तुम्ही मतदारसंघाकडे लक्ष द्या, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात एकच शिवसेना असल्याचे व आपल्याकडे वेगळ्या गटासंदर्भात कोणीही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेगळा गट म्हणून मान्यता घेण्याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे मागणी करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले. या बैठकीमध्ये आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना, "आपला आदेश हाच आमच्यासाठी व्हीप असेल, अन्य कुणाचाही व्हीप आम्ही मानणार नाही," असे सांगितले. तर उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर लढाईत आपली बाजू भक्कम आहे. तेव्हा काळजी करू नका, असा धीर आमदारांना दिला.