

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह ९ सदस्यांना मंगळवारी विधानपरिषदेत निरोप दिला जाणार आहे. या ९ जणांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत येत्या १३ मे रोजी संपत असल्याने त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांना निरोप दिला जाणार असून यावेळी विधानपरिषदेत शाब्दिक जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना (तेव्हा पक्षात फूट पडली नव्हती) आणि भाजप यांच्यात तीव्र मतभेद झाले. या मतभेदातून उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा ते विधिमंडळाचे सदस्य नव्हते. २०२० च्या विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले.
आता ठाकरे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे, रणजितसिंह मोहिते-पाटील आणि संजय केनेकर हे एकाचवेळी निवृत्त होत आहे. प्रथेप्रमाणे विधान परिषदेची मुदत संपण्याच्या शेवटच्या अधिवेशनात शेवटी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप दिला जातो. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाचे सूप २५ मार्चला वाजणार आहे. त्यामुळे आज या सदस्यांना निरोप दिला जाईल. यावेळी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह निवृत्त होणाऱ्या सदस्यांचे छायाचित्र घेण्यात येणार आहे.