मुंबई : विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने लालबाग राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी नाराज झाले होते. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती केल्याने सुधीर साळवींची जबाबदारी वाढली आहे. लालबाग-परळ म्हटलं की कट्टर शिवसैनिक. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावयाचा हे एकच लक्ष्य असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सचिव पदावर नियुक्ती झाल्यानंतर सुधीर साळवी यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक सचिन पडवळ, आशिष चेंबूरकर आदी नेते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. मविआतील घटक पक्ष शिवसेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा विचार न करता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच पक्षाचे प्रवक्ते आणि काही पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर मुंबईतील लालबाग राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्याकडे शिवसेनेच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. आपलं लक्ष मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांवर असून त्यासाठीच सुधीरला सचिव पद दिल आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राजकीय समीकरणे
लालबाग परिसर हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे, सुधीर साळवी यांच्याकडे मोक्याच्या क्षणी पक्षाचे सचिवपद देऊन उद्धव ठाकरे यांनी अनेक राजकीय समीकरणे साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.