
मुंबई : भाजपकडून अनेकदा वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. अगदी महात्मा गांधी किंवा इतर कुणी नेहरूंना पंतप्रधान करून चूकच केली. वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर संघ दिसलाच नसता, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीच्या राज्यव्यापी परिषदेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
जनसुरक्षा कायदा पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा कायदा देशविरोधी असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. या कायद्याबाबत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जनजागृती मोहीम राबवण्यात यावी. सत्तेची ताकद महायुती सरकारमध्ये असली तरी सरकारला जागा दाखवण्याची ताकद आपल्यात आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, शेकाप, भाकप, माकप आदी पक्षातील नेते उपस्थित होते. "जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीने राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले आणि या कार्यक्रमासाठी उल्काताईंचा फोन आला. मी होकार देत हा कायदा किती वाईट आहे, हे लोकांना पटत नाही, तोपर्यंत आपण थांबायचे नाही. आम्ही विरोधी आहोत, पण तुमच्या सडलेल्या मानसिकतेचे विरोधी आहोत. राजकारणात मतभिन्नता असू शकते. पण राजकारणात व्यक्तिगत द्वेष असू नये. डावे आणि शिवसेना यांच्यातही यापूर्वी मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला. परंतु जनताविरोधी सरकारच्या विरोधात आम्ही सगळे एकत्र येण्याचे कारण म्हणजे आम्ही देशप्रेमी आहोत. जनसुरक्षा कायद्यात कडवे-डावे असा उल्लेख असला तरी संविधानात तसा उल्लेख नाही. रशिया आणि चीन हा डावा आहे. मग मोदी तिकडे का जात आहेत ? भाजपची ही दुटप्पी भूमिका आहे. स्वातंत्र्यलढ्यात भाजप नव्हता हे जगजाहीर असून दुसऱ्यांचा आदर्श चोरायचे हेच काम त्यांचे आहे," अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.
जनसुरक्षा हा कायदा देशाला अराजकतेकडे घेऊन जाणार आहे. देशाला स्वांतत्र्य मिळाले, उद्या स्वांतत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. पण या जनसुरक्षा कायद्याला विरोध करणे गरजेचे असून स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या लढाईसाठी आपल्याला उतरावे लागले, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
... मग मंत्र्यांना कधी अटक करणार ?
एका भाजपच्या व्यक्तीची न्यायमूर्ती म्हणून निवड केली जाते, आज लोकशाही सर्वोच्च न्यायालयाच्या दारात तडफडत आहे. आज जरा काही झाले की, भाजप म्हणते की, काँग्रेसच्या काळात झाले. अहो तुमचा जन्म पण नेहरूंच्या काळात झाला होता. यात काय नेहरूंची चूक आहे. जो कोणी देशद्रोही आहे, त्याला फासावर लटकवा, मग तो कोणीही असेना. वसई-विरारमध्ये माजी आयुक्ताकडे पैसे सापडले, म्हणून त्यांना अटक केली. पण मंत्र्यांकडे पैशांची बॅग, रोकड सापडली मग त्यांना का अटक नाही? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित करत मंत्री संजय शिरसाट यांचे नाव न घेता टीका केली.
दिल्लीतील कुत्र्यांचे काय ? - उद्धव
महाराष्ट्र आणि मुंबईत हे कबुतर, कुत्र्यांच्या मागे लागले आहेत. कुत्र्यांच्या मागे लागल्यानंतर एक खंडपीठ नेमले गेले. खंडपीठाने जरी निकाल दिला तरी त्यात आम्ही लक्ष घालू, असे कुत्र्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने म्हटलेय. जर कुत्री पकडली तर झाडावरची माकडे खाली येतील, असे मनेका गांधींनी म्हटलेय. मी कुठल्याही खासदाराचा अपमान करू इच्छित नाही. पण संसदेत अधिवेशनात बाहेर माकडे येऊन बसले होते, परंतु सुप्रिया, त्या दिल्लीतील कुत्र्यांचे काय? असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
फडणवीसांनी स्वतःला अभिप्रेत जनसुरक्षा कायदा आणला - सपकाळ
देवेंद्र फडणवीस यांनी जनसुरक्षा नावाने आणलेला कायदा हा लोकशाही असुरक्षा कायदा आहे. महाराष्ट्राच्या या 'चिप मिनिस्टर'ला आता दिल्लीत जाऊन पंतप्रधान बनण्याचे स्वप्न दिवसाढवळ्या पडू लागले आहे. त्यासाठीच गोलवलकर यांच्या 'बंच ऑफ थॉट'ला अभिप्रेत भारत करण्यासाठी फडणवीस यांच्याकडून हा सर्व खटाटोप सुरू आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर केला.
हा सत्तेचा गैरवापर - शरद पवार
लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर संकट, त्याच्यावर हल्ला या गोष्टी दैनंदिन झालेल्या आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे, अनेक पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, नेते मग त्याच्यामध्ये तेलतुंबडेंचे नाव घ्यावे लागेल किंवा आमचे एकेकाळचे सहकारी एकनाथ साळवे यांचे नाव घ्यावे लागेल. काहीतरी खोट्या कारणाने अटक करायची आणि महिनोन् महिने तुरुंगामध्ये डांबून ठेवायचे. त्या ठिकाणी त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याच्या अधिकारांवर हल्ला करायचा, हे चित्र महाराष्ट्रामध्ये सातत्याने बघायला मिळते, असा हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपवर केला.