"सकाळी पाच-सहा वाजले, तरी त्यांना..." उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले

मोदी सरकारचा हा डाव आहे. तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्याविरोधात मतदान करू नये यासाठी ते प्रयत्न करतायत, असं ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेउद्धव ठाकरे

मुंबई : आज लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राज्यातील १३ लोकसभा मतदारासंघांतही पाचव्या टप्प्यात समावेश आहे. दरम्यान आज मतदानादरम्यान निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरे संतापले. मोदी सरकार निवडणूक आयोगाला घरगड्यासारखं वागवतंय. शिवसेनेला जिथं जास्त मतदान होतं, त्या भागात मतदानाला विलंब लावला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सकाळी पाच-सहा वाजले, तरी शेवटच्या मतदाराचं मतदान होईपर्यंत निवडणूक प्रतिनिधींना बाहेर पडू देऊ नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मतदारांना केलं.

निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय....

उद्धव ठाकरे म्हणाले की, "निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय, हे स्पष्ट दिसतंय. मतदारांमध्ये उत्साह आहे, पण मतदान केंद्रात बसलेले निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी खूप दिरंगाई करतायेत. विशिष्ट वस्त्यांतील मतदारांची नावे तीन-चारवेळा चेक केली जातायेत. ज्येष्ठ मतदारांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. महिलांना त्रास होतोय. पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. तरीही मतदार रांगा लावून उभे आहेत. मोदी सरकार निवडणूक आयोगाचा उपयोग घरगड्यासारखा करतोय. मत नोंदवताना दप्तदिरंगाई होत आहे."

पहाटे पाच सहा जरी वाजले, तरी सोडू नका....

मतदारांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, "थोडा वेळ राहिला असला तरी मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका. मतदान केंद्रात जाऊन उभे राहा. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी आज कितीही वाजले, अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले, तरी सोडू नका. तुमचा मतदानाचा हक्क बजावल्याशिवाय बाहेर पडू नका."

त्यांची नावं शिवसेना शाखेत सांगा...

याशिवाय उद्धव ठाकरेंनी पोलिंग एजंट आणि मतदारांना आवाहन केलं की, "कोणत्याही मतदान क्षेत्रामध्ये मतदान केंद्रावर मुद्दामहून उशिर केला जात असेल तर, त्यांची नोंद तिथल्या शिवसेना शाखेत करा. निवडणूक प्रतिनिधींची नावेसुद्धा विचारा, त्यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागता येईल आणि माझ्याकडे नावं आल्यास प्रेस कॉन्फरन्स घेऊन नावानिशी, स्थळानिशी माहिती जाहीर करून टाकेन."

मोदी सरकारचा हा डाव...

"मोदी सरकारचा हा डाव आहे. तुम्ही मतदानाला उतरू नये, त्यांच्याविरोधात मतदान करू नये यासाठी ते प्रयत्न करतायत. जिथे आम्हाला मतदान जास्त होतं, त्या भागातून जास्त तक्रारी येतायत. त्या भागातून मला आज नावं आली तर मी उद्या जाहीर करेन. निवडणूक अधिकाऱ्यांची नावं नोंदवा, त्यांच्याविरोधात कोर्टात जाता येईल, तक्रार करता येईल," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in