

मुंबई : नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले असून विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही, अशी टीका करत एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्यात सरकारला कमीपणा वाटतो? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे केला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन तिथे एखाद्या सक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि ‘कॉकरोच पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. देशभरातील विरोधी पक्षांनी, सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करत ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
नीट पेपरफुटी प्रकरणावरून ठाकरे म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे? यात सरकारला कमीपणा का वाटतो?, असा सवाल केला. पालकांनी आयुष्याची पुंजी लावून मुलांना शिकवले, पण एका पेपरफुटीमुळे सर्व बरबाद झाले. पेपरफुटीचे सर्वाधिक धागेदोरे आणि अटका महाराष्ट्रात झाल्या आहेत. तरीही सरकारला याची चिंता नाही.”