
मुंबई : ‘महाराष्ट्रातील महायुतीचा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणारा आहे’, अशी टीका अमित शहा यांनी नुकतीच केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो, हे तुम्हाला भविष्यात दिसेल’, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला. ‘मराठी माणसाच्या नादी लागू नका. जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा किस झाड की पत्ती आहे’, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
अंधेरी येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गुरुवारी उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज्यातील जनता तुम्हाला जागा दाखवेल. आगामी निवडणुकीत आपल्याला सूड उगवायचाय, असा इशारा उद्धव विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आगामी निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढायची असल्यास तुमचा जो निर्णय असेल तो जाहीर करेन. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेतही यावेळी दिले. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, भास्कर जाधव, अरविंद सावंत, सुभाष देसाई, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
राजन साळवींची दांडी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा असलेले उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी या मेळाव्यात गैरहजर होते. त्यामुळे साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, हे नक्की झाल्याचे मानण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल मला पटलेला नाही. मविआसाठी पराभव धक्का देणारा तर एवढा प्रचंड विजय कसा झाला हे भाजपलाही धक्का देणारे होते. त्यामुळे तुम्हाला हा निकाल पटला का, असा सवाल त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना विचारला. तुम्ही शिवसैनिक सोबत आहात, तोपर्यंत मी पक्षप्रमुख. आम्ही आजही बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत. तुम्ही म्हणाल, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्याच दिवशी पक्षप्रमुखपद सोडेन, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली.
अमित शहा यांना माहीत होते महाराष्ट्राची निवडणूक हरलो, तर दिल्लीचे तख्त कोसळेल. त्यामुळे अमित शहा यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. भाजपने झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवावा!
हिंदुत्वाची भाषा करणारे कुठे कुठे काय करतात ते सगळे फोटो माझ्याकडे आहेत. मोहन भागवत मशिदीत गेले, मी नाही गेलो. देशप्रेमी मुस्लिम आमचे हे बाळासाहेबांचे मत होते, ते आमचेही आहे. तसे भाजपचे मत नसेल तर त्यांनी आपल्या झेड्यातील हिरवा रंग काढून दाखवावा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
आगामी मुंबई महापालिका, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना ठाकरे गटाने सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
एकनाथ शिंदेंना चिमटा
अडीच वर्षं घटनाबाह्य मुख्यमंत्री होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस विजय मिळाला आणि एकनाथ शिंदे नकोसे झाले. ‘हवं तर घे नाही तर जा’ आणि ‘रूसू बाई रूसू, गावात जाऊन बसू’, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना काढला.