गद्दार खंडोजी खोपडे जात आहेत तर जाऊ द्या - उद्धव ठाकरे

आज छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन साडेतीनशे वर्ष होऊन गेली. पण खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांच्या डोक्यावरील गद्दारीचा शिक्का अजूनही पुसला गेलेला नाही. मग या खंडोजी खोपडेंच्या अवलादींनी...
गद्दार खंडोजी खोपडे जात आहेत तर जाऊ द्या - उद्धव ठाकरे

प्रतिनिधी/मुंबई : आज छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन साडेतीनशे वर्ष होऊन गेली. पण खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांच्या डोक्यावरील गद्दारीचा शिक्का अजूनही पुसला गेलेला नाही. मग या खंडोजी खोपडेंच्या अवलादींनी खुशाल जावे, असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. एका बाजूला देशभक्त आणि दुसऱ्या बाजूला द्वेषभक्त असा हा लढा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रविवारी गोरेगाव येथील शिवसेना शाखा आयोजित सभेत ते बोलत होते. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी आपल्यासोबत आहे. जात पात बाजूला ठेवून देश हाच माझा धर्म माना आणि देश आणि लोकशाही रक्षणासाठी एकत्र या असे आवाहनही त्यांनी केले.

भाजपावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपमध्ये त्यांचा कोणी उरलेला नाही. रा. स्व. संघाला शंभर वर्षे होत आहेत पण ती भाकड आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरच्या लोकांना आयात करावे लागत आहे. यांचे जय श्रीराम ठीक आहे, पण भाजपमध्ये आता सगळे आयाराम आहेत, प्रशांत कुमार जगदेव ही व्यक्ती ओडिशात आहे. नवीन पटनाईक यांनी त्यांना पक्षातून काढून टाकले. कारण या माणसाने भाजप कार्यकर्त्यांच्यावर गाडी घातली होती. आता त्यांना भाजपाने वाजतगाजत पक्षात घेत उमेदवारी दिली. अस्सल भाजपावाले आहेत त्यांनी एकमेकाला विचारले पाहिजे. कार्यकर्त्यांना चिरडणारा डोक्यावर बसवला. म्हणूनच संघ, भाजपाला माझा सवाल की हेच तुमचे हिंदुत्व आहे? आमचे हिंदुत्व ज्वलंत आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आंदोलन, रक्तदान ही आमची वृत्ती असून कोणतेही संकट असो पहिला धावून जातो तो शिवसैनिक. रक्तदान करताना आम्ही विचार करत नाही की, देणारे रक्त कोणाला जाईल. आज ग्रामीण भागातील मुस्लिम लोकही आपल्यासोबत आले आहेत.

मी त्यांना विचारतो आमचा भगवा झेंडा आहे. पण ते म्हणतात, तुमचा भगवा आणि भाजपाचा भगवा यात फरक आहे. शिवसेनाप्रमुखांनी धार्मिक द्वेषापायी मुसलमानांना मारा असे सांगितले नाही.

शिवसेनेचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटविणारे हिंदुत्व आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अमोल कीर्तिकर यांना केवळ विजयी करायचे नाही तर समोरच्याचे डिपॉझिट जप्त करून मला विजय हवा आहे, असेही त्यांनी यावेळी बजावले.

logo
marathi.freepressjournal.in