

मुंबई : ‘आजकाल चोरी पकडली की चोर त्याला ‘ऑपरेशन’ म्हणतात. भाजपच्या राजवटीत देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असून ती लोकशाहीला धोकादायक आहे. जर सत्ताधारीच असे ‘ऑपरेशन’ करत असतील, तर आता देशाला वाचवण्यासाठी आपल्याला मिळून ‘ऑपरेशन कमळ’ (भाजपवर शस्त्रक्रिया) करावे लागेल’, अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हीरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मी संघटनेचा साक्षीदार असून मागील १२-१३ वर्षे पक्षनेतृत्वाची जबाबदारी सांभाळत आहे. ज्याक्षणी वाटेल, त्या दिवशी मी पद सोडल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना करताच, संपूर्ण सभागृह उठून उभे राहिले आणि तुम्ही पद सोडू नका, असा आग्रह सर्वच शिवसैनिकांनी धरला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बंडखोर खासदार, काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची अफवा, भाजपचे हिंदुत्व आणि ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवरून अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण केले. 'वन नेशन, वन इलेक्शन'वरून यांची वाटचाल 'वन पार्टी, नो इलेक्शन'कडे सुरू आहे. ’असा टोला लगावत, ज्या देशात तरुणाईला 'झुरळ' मानले जाते, त्या देशाचे भविष्य काय असणार? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? शिवसेना कधीही कुणात विलीन होत नसते. काँग्रेससोबत आपले टोकाचे वैर होते, पण त्यांनी कधी 'मातोश्री'वर डोळे वटारले नाहीत. भाजपने मात्र शिवसेनेला मुळासकट उपटून काढण्याचा प्रयत्न केला. भाजपचे निष्ठावान नेते आता दिल्लीच्या आदेशामुळे मिंधेंची दाढी खाजवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपच्या 'फोडाफोडीच्या' राजकारणावर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘भाजपचे दोन तृतीयांश खासदार बाहेरचे आहेत. तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत, म्हणून आमची पोरं का पळवताय? तुमच्या विचारांच्या वांझोटेपणावर आधी उपचार करा." बंडखोरांना सुनावताना ते म्हणाले, ‘प्रत्येक लोकसभेत मी ६ ते १० सभा घेतल्या तेव्हा हे निवडून आले. खरी किंमत उद्धव 'बाळासाहेब' ठाकरे या नावाला आहे, पारंब्यांना नाही."
ठाकरे कुटुंबावर (पत्नी रश्मी, आदित्य आणि तेजस) होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मातोश्रीवर शिंतोडे उडवणारी ही कुठली औलाद आहे? ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या रक्तात स्वाभिमान रुजवला, त्या रक्तात ही भेसळ कुठून आली? छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकारांनाही असा त्रास सहन करावा लागला होता."
निवडणूक जिंकण्यासाठी सुरक्षा दलांचा गैरवापर
‘सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात प्रांत आणण्यासाठी रझाकारांवर पोलीस कारवाई केली होती. पण यांनी बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी दोन-अडीच लाख पोलीस घुसवले. पक्ष फोडायला तुम्ही देशाचे सुरक्षा दल वापरता? हेच बळ मणिपूर किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये का घुसवले नाही?" असा थेट सवाल ठाकरेंनी विचारला.
शेतकऱ्यांना अटी आणि खासदार खरेदीला सवलती?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना हजारो अटी लादल्या जातात. पण आमदार आणि खासदार विकत घ्यायला तुमच्याकडे कोणतीही अट नाही? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, पण आमदार-खासदारांचा हमीभाव मात्र ठरलेला आहे. 'लाडकी बहीण' योजनेतही ८० लाख महिलांना अपात्र ठरवले गेले’.
सहा खासदारांमुळे पक्षाचे विलीनीकरण होत नाही
उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या कायदेशीर वैधतेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. ‘दहाव्या अनुसूचीनुसार स्वतःहून पक्ष सोडणारा अपात्र ठरतो. केवळ ६ लोकांच्या मतानुसार पक्षाचे विलीनीकरण होत नाही, त्यासाठी पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम असतो,’ हे त्यांनी स्पष्ट केले.
मला नेतृत्वाची हाव नाही...
भाषणाच्या शेवटी शिवसैनिकांना अत्यंत भावनिक साद घालत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘संकटामागून संकटे येतील, पण शिवसैनिक सोबत असेपर्यंत मी डगमगणार नाही. पण जर तुम्हाला कोणा लाचार माणसाने केलेले आरोप खरे वाटत असतील, तर मला नेतृत्वाची कोणतीही हाव नाही, मी आत्ता पायउतार व्हायला तयार आहे’.
फुटीर खासदारांविरोधात पेटून उठण्याचे आदेश
पक्षातील सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्यावरून ठाकरे यांनी मतदारांची माफी मागितली. त्याचवेळी तुम्ही ज्यांना मते दिलीत,त्यांनी तुमचा विश्वासघात केला. त्यांना जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही बजावणार की नाही? सवाल करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना फुटीर खासदारांच्या विरोधात पेटून उठण्याचे आदेश दिले. षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांसह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जबरदस्त हल्ला चढवला.
अमित शहा यांच्यावर नाव न घेता टीका
भाजपच्या ज्या नेत्यांना एकेकाळी तडीपारी किंवा इतर संकटांचा सामना करावा लागला, त्यांना बाळासाहेबांनी आपला माणूस' म्हणून आश्रय दिला आणि वाचवले. मात्र आज तेच नेते उपकार विसरून शिवसेना संपवायला निघालेआहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते अमित शाह यांच्यावर नाव न घेता केली.
‘ते’ खासदार अनुपस्थित
ऑपरेशन टायगरमुळे चर्चेत असलेले सहा खासदार आजच्या सभेत हजर राहणार का याची अनेकांना उत्सुकता होती. पण यापैकी कोणीही शिंदे गटाच्या सभेला आले नाहीत. त्यांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्याची प्रक्रिया बाकी असल्याने ते अनुपस्थित राहिले.
वाजे यांचे उत्स्फूर्त स्वागत
शिवसेना ठाकरे पक्षातील ६ खासदारांसोबत पक्षातून बाहेर पडण्यास स्पष्ट नकार दिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सभागृहात आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला…निष्ठावंत…अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी देखील वाजेंना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.