गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या! उद्धव ठाकरे यांची मागणी

आज एका बाजूला गिरणी कामगार मुंबईबाहेर फेकला जातोय आणि अख्खी मुंबई अदानीला आंदण दिली जात आहे. गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या आणि अदानीला टॉवर बांधण्यासाठी शैलू, वांगणीला जागा द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : आज एका बाजूला गिरणी कामगार मुंबईबाहेर फेकला जातोय आणि अख्खी मुंबई अदानीला आंदण दिली जात आहे. गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या आणि अदानीला टॉवर बांधण्यासाठी शैलू, वांगणीला जागा द्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.

मी मुख्यमंत्री असताना शासकीय कर्मचारी, पोलिसांना घरे देण्याचा निर्णय घेतला आणि घरांचे वाटप करण्यात आले. सरकार पाडले नसते, तर आजही गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून दिली असती, असे ठाकरे म्हणाले.

मुंबईतील धारावीची जागा अदानीच्या घशात घातली जात आहे. मुंबईतील इतर जागा देखील अदानीला दिल्या जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ज्यांनी मुंबई उभे केली, त्यांना तुम्ही मुंबईच्या बाहेर जागा देणार आहात का? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. सर्व गिरणी कामगारांना धारावीमध्ये जागा देण्याची मागणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली.

गेल्या अनेक वर्षांपासून गिरणी कामगारांचा संप तांत्रिकदृष्ट्या आजही सुरूच आहे. त्यावेळी ‘वन थर्ड, वन थर्ड’ करत गिरणी कामगारांच्या तोंडाला पाने पुसली, गिरणी कामगारांची घरे, जमिनी गेल्या. तेथे टॉवर उभे राहिले. संयुक्त महाराष्ट्रात गिरणी कामगारांनी घाम गाळून आंदोलन करत मुंबई मिळवली आणि तोच गिरणी कामगार स्वतःच्या नगरीत बेघर झाला आहे, अशी टीका त्यांनी केली.

मीरा-भाईंदर येथे मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, यात पोलीस आयुक्तांना जबाबदार ठरवले तरी राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे तेही तितकेच जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले.

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर सभागृहात गदारोळ

गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनांचा प्रश्नावरून विधा सभेतही गदारोळ झाला. ‘गिरणी कामगारांना मुंबईत घरे द्या, शैलू, वांगणी येथे पाठवण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी सभागृहात केली. यावरून सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला.

गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत, अशी गिरणी कामगार संघटनांची मागणी आहे. या मागणीला २५ एप्रिल २०२५ च्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात सहमती दर्शविली आहे. त्यासाठी मुंबईत उपलब्ध असलेल्या जागांची माहिती शासनाला देण्यात आली आहे, असे जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मुंबईत अंदाजे ७६ एकर जागा उपलब्ध आहे. पण सरकार गिरणी कामगारांना मुंबईपासून दूर शेलू आणि वांगणीला पाठवत आहे. सरकारच्या भूमिकेला कामगारांनी पूर्णतः विरोध दर्शविला आहे. सरकारची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली असून ही योजना शासनाने ताबडतोब रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आझाद मैदानात गिरणी कामगारांचे आंदोलन

मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी गिरणी कामगारांच्या १४ संघटनांनी एकत्र येत बुधवारी आझाद मैदानावर आंदोलन केले. या आंदोलनात विरोधी पक्षातील सर्वच नेते सहभागी झाले होते. विविध पक्षांच्या नेत्यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

logo
marathi.freepressjournal.in