उद्धव यांचे ‘मिशन मुंबई’; ३८ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश

उद्धव यांनी ‘मिशन मुंबई’ हाती घेतले असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई व उपनगरातील ३८ जागांवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले आहे.
उद्धव यांचे ‘मिशन मुंबई’; ३८ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश
Published on

रोहित चंदावरकर/मुंबई

लोकसभा निवडणुकीचे तपशीलवार विश्लेषण करण्यास शिवसेनेने (उबाठा) सुरूवात केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. उद्धव यांनी ‘मिशन मुंबई’ हाती घेतले असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई व उपनगरातील ३८ जागांवर लक्ष केंद्रीत करायला सांगितले आहे.

शिवसेनेच्या (उबाठा) वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईतील ३८ पैकी २८ जागा शिवसेनेला द्याव्यात, अशी मागणी आम्ही आघाडीतील घटकपक्षांकडे करणार आहोत. मुंबई दक्षिण-मध्य व वरळी विभागात शिवसेनेने सर्व लक्ष केंद्रीत केले आहे. कारण उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे वरळी विभागातून निवडून गेलेले आहेत. आता वरळी मतदारसंघात भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व राज ठाकरे यांची मनसे यांनी ताकद लावायला सुरुवात केली आहे.

ठाकरे गटाने मुंबईच्या काही लोकसभा मतदारसंघात चांगली कामगिरी केली आहे. मध्य मुंबईतील काही भाग हा शिवसेनेसाठी (उबाठा) महत्वाचा आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काही भागात पक्षाला काहीशी पिछेहाट स्वीकारावी लागेल. तसेच वरळी भागात पक्षाला पाहिजे तशी मते मिळाली नाहीत.

शिवसेनेचे नेते अनिल परब म्हणाले की, आम्ही नक्कीच वरळी पुन्हा जिंकू. कारण लोकसभेसाठी व विधानसभेसाठी मतदार वेगवेगळे मतदान करतात. लोकसभेत राष्ट्रीय मुद्दे असतात, तर विधानसभा निवडणुकीत बहुतांशी मुद्दे हे स्थानिक असतात.

लोकसभेच्या दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे (उबाठा) अनिल देसाई हे विजयी झाले होते. पण, पक्षाला दक्षिण मुंबई किंवा ईशान्य मुंबईप्रमाणे मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला नाही. मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी व अणुशक्तीनगर भागातील अल्पसंख्याकांची मते ‘मविआ’कडे वळली.

बालेकिल्ल्यातील पारंपरिक मते पुन्हा कशी मिळतील, यासाठी पक्षाने काम करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर व भाजपच्या आक्रमकपणामुळे ही मते ठाकरे गटापासून दूर गेली होती.

भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, भाजप व मनसेमध्ये वरळी विधानसभेबाबत चर्चा सुरू आहे. या मतदारसंघातून मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना शिवसेना नेते (उबाठा) आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उतरवण्याची तयारी सुरू आहे. यंदा शिवसेना ठाकरे गटाला मुंबई व ठाण्यात भाजप, एकनाथ शिंदे, मनसे व अजित पवार राष्ट्रवादी यांच्याशी अटीतटीला लढा द्यावा लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in