उद्धव ठाकरे २७ ऑगस्टपासून मराठवाडा दौऱ्यावर

हिंगोलीत जाहीर सभा घेणार
उद्धव ठाकरे २७ ऑगस्टपासून मराठवाडा दौऱ्यावर

मुंबई : राज्यातील सातत्याने बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने देखील लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या २७ ऑगस्ट रोजी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात २७ ऑगस्ट रोजी ते हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत.

उद्धव ठाकरे येत्या २७ ऑगस्टपासून मराठवाडयाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या सव्वा वर्षात शिंदे गटाने जो दणका दिला आहे, त्यानंतर आता पक्षाला सावरण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. मराठवाडयात पक्षाला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. ही व्होट बँक कायम ठेवावी लागणार आहे. हिंगोली शहरातच २७ ऑगस्ट रोजी त्यांची जाहीर सभा होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे बांगर यांच्याबद्दल काय बोलणार, याचे औत्सुक्य आहे.

दरम्यान, सर्वच पक्षांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शरद पवार यांची देखील गुरूवारी बीड येथे जाहीर सभा झाली. आता उद्धव ठाकरे देखील सभांचा धडाका सुरू करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सभा घेण्यास सुरूवात केली आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in