
मानहाणी प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींना मोठा धक्का बसला. त्यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करून त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज्यभर या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक झाले असून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. अशामध्ये आता उद्धव ठाकरे यांनीदेखील याबद्दल टीका करताना, "चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे" असे म्हणत टोला लगावला आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत म्हंटले की, "चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे फिरत आहेत आणि राहुल गांधींना शिक्षा ठोठावली गेली आहे. लोकशाहीचे हे हत्याकांड असून सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात असून आता फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल." अशी टीका त्यांनी केली आहे.