

मुंबई : ‘पुन्हा नव्याने सुरुवात करू. शिवसेनेला नवी पालवी फुटलेली आहे. पानगळ होणे गरजेचे असते. सडलेली पाने झडलीच पाहिजेत, ती सडेपर्यंत नवे कोंब फुटत नाहीत. सडलेल्या पानात जीव नाही, विकली गेलेली पाने झाडाला तरारी देऊ शकणार नाहीत. आजही प्रत्येक वॉर्डात एकापेक्षा एक सरस उमेदवार बसले होते. काही जणांना सर्व काही दिले तरी ते नाराज झाले. मला सर्व शिवसैनिक सारखे आहेत. जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे’, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, आजपासून बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. या सगळ्या काळात अनेक चढ-उतार आपण सर्वांनी पाहिले, अनुभवले आहेत. राज आणि माझे बालपण एकत्र गेले, आम्ही वादळात खेळत मोठी झालेली मुले आहोत, त्यामुळे वादळाशी कसे लढायचे हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. वादळाची जबाबदारी खांद्यावरती पेलणे किती कठीण असते हे ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, त्यालाच कळू शकते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विजय अशक्य असल्यास शत्रू गद्दारांची मदत घेतो...
आपल्याशी बोलताना सगळी वर्ष, सगळा काळ डोळ्यासमोरुन जातोय, कोणती गोष्ट सांगायची, काही कळत नाही. शिवसेनाप्रमुख, हिंदूह्रदयसम्राट हे जगासाठी, पण माझी ओळख माझे वडील म्हणून त्यांच्याशी झाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांना त्यांच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते, त्याला मी काही करु शकत नाही. जेव्हा आपण महाराष्ट्राचा, महाराष्ट्र धर्माचा विचार करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापूर्वीचा विचार केला तरी गद्दारी हा विषय आजचा नाही. हा आपल्याला लागलेला शाप आहे. जेव्हा विजय अशक्य असतो तेव्हा आपला शत्रू गद्दारांची मदत घेत असतो. गद्दारी आजपर्यंत भगव्याशी झाली नसती तर महाराष्ट्राने जगाचा इतिहास बदलून टाकला असता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल?
मुंबईत पहिल्यांदाच पैशांचा वापर केला गेला. दार बंद असलं तर दाराच्या खालून लिफाफे फेकण्यात आले. महाराष्ट्र विकत घेताय का? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. ठाकरे नाव पुसून टाका, शिवसेना नाव पुसून टाका व मग मुंबई आणि महाराष्ट्राचा विचार करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवरायांचा भगवा उतरवून काय मिळवलंत?
बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपण जगायचं हे कसं विसरुन गेलो, तर दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून जगणं आपल्या नशिबी येईल. मेलो तरी बेहत्तर दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून मी आयुष्यात कधी जगणार नाही ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे. मराठ्यांचा इतिहास जेवढा रक्तरंजित आहे, तितका रक्तरंजित इतिहास जगाच्या पाठीवर नाही. मात्र, रक्तरंजित इतिहासात पाठीवर वार गद्दारांनी केलेत. मुंबईवरचा शिवरायांचा भगवा उतरवून काय मिळवलंत, काय महापौरपद, अरे आपल्याकडे २५ वर्षे सत्ता होती. आपण सर्व गड राखले हे कर्तृत्त्व तुमचे आहे. मुंबईकरांनी इतर सर्वांनी विचार करावा आपल्याला जपणारा कोण आहे आणि आपला व्यापार करणारा कोण आहे, असे आवाहन त्यांनी केले.
यांना महाराष्ट्र गिळायचाय...
आपलेच दांडे आपल्यावर घाव घालण्यासाठी हे दोन व्यापारी वापरत आहेत. आपल्याला राग येतोय. मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात, आज सगळे हळहळत आहेत. ही लढाई तुम्ही उत्तम पद्धतीने लढलात, अशा प्रतिक्रिया देशभरातून येत आहेत. शिवसेना संपली, ठाकरे नाव पुसून टाकणार हे चित्र निर्माण केले जात होते, त्यांना तुम्ही रोखलंत, हे फक्त महाराष्ट्र करू शकतो, असे सांगताना संपूर्ण महाराष्ट्र यांना वेगळ्या पद्धतीने पादाक्रांत करायचाय, महाराष्ट्र गिळायचा आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.