आज महाविकास आघाडीने भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव केला. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत (Kasaba ByElection) ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपचे हेमंत रासने यांचा त्यांनी पराभव केला. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीदेखील पहिली प्रतिक्रिया आली आहे. यावेळी ते म्हणाले की, "कसबा भ्रमातून बाहेर पडला, तसा देशही या भ्रमातून बाहेर पडायला वेळ लागणार नाही." असे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये ते म्हणाले की, "कसाब पोटनिवडणूक जिंकली याचा आनंद आहे. मतदार वेगळा विचार करू शकतात हे यामुळे पुन्हा समोर आले आहे. यावेळी भाजपची वापरा आणि फेका ही नीती त्यांना भोवली आहे. जर कसबा इतक्या वर्षानंतर भाजपच्या भ्रमातून बाहेर पडू शकतो, तर देशदेखील बाहेर पडू शकतो," असे विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
"भाजपच्या विरोधात मतदान करणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. जोपर्यंत त्यांना गरज होती, तोपर्यंत त्यांनी वापर केला. याच भाजपने टिळकांचा देखील वापर केला आणि आता सोडून दिले. गिरीश बापट यांनादेखील तब्येत बरी नसताना प्रचारासाठी आणले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासोबतदेखील असेच केले होते. पण त्यानंतर त्यांच्या मुलाला संधी दिली नव्हती," अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशात लोकशाही जीवंत राहावी, यासाठी आमचा लढा सुरु आहे. न्यायालयाच्या निर्णयाने आमच्या आशेला अंकूर फुटला आहे. निवडणूक आयोगाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल दिलासादायक आहे. याबद्दल मी सातत्याने भाष्य करत आलो आहे, की निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीची प्रक्रिया बदलली पाहिजे. अखेर हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे." अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.