

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पक्ष संघटन आणि संभाव्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी ‘मातोश्री’वर बोलावण्यात आलेल्या बैठकीत पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड झाली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला. या उघड गटबाजीने संतप्त झालेल्या ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक शिस्तीचे धडे देत कठोर शब्दांत फटकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी सोमवारी कळवा आणि कल्याण परिसरातील संघटनात्मक आढावा तसेच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या निर्णयावरून बैठकीत वादाची ठिणगी पडली.
गटबाजीमुळे नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. “देशात अभिजीत दीपकेसारखा एक तरुण आंदोलनाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देत आहे आणि तुम्ही मात्र पदांसाठी आपापसात भांडत आहात. अशा वृत्तीने पक्ष कसा वाढणार?” अशा शब्दात ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले.