उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा संबंध नाही! राहुल शेवाळे यांचा मानहानीचा दाव्याप्रकरणी वकिलांचा दावा

‘सामना’ या मुख्यपत्रातून खासदार शेवाळे यांच्याविरोधात २९ डिसेंबर २०२२ रोजी आक्षेपार्ह वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा संबंध नाही! राहुल शेवाळे यांचा मानहानीचा दाव्याप्रकरणी वकिलांचा दावा

मुंबई : ‘सामना’ वृत्तपत्रातून बदनामीकारक वृत्त प्रसिद्ध झाल्याने शिंदे शिवसेना गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या १०० कोटी रुपयांच्या मानहानी दाव्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा काही संबंध नाही. पीआयबी कायद्यानुसार वृत्तांची निवड करणे आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जबाबदारी ही अतुल जोशी यांची आहे, असा दावा ठाकरे आणि राऊत यांची बाजू मांडणाऱ्या अ‍ॅड. मनोज पिंगळे यांनी केला.

‘सामना’ या मुख्यपत्रातून खासदार शेवाळे यांच्याविरोधात २९ डिसेंबर २०२२ रोजी आक्षेपार्ह वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. शेवाळे यांचा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे आणि त्यामध्ये राहुल शेवाळे यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी शेवाळे यांनी याप्रकरणी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी दोषमुक्ततेसाठी अर्ज केला आहे.

या अर्जावर दंडाधिकारी एस. बी. काळे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी ठाकरे आणि राऊत यांच्या वतीने अ‍ॅड. मनोज पिंगळे यांनी युक्तिवाद केला. या खटल्याशी ठाकरे आणि संजय राऊत यांचा काहीही संबध नाही. पीआयबी कायद्यानुसार वृत्तांची निवड करणे आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जबाबदारी ही अतुल जोशी यांची आहे. त्यामुळे ठाकरे आणि राऊत यांनी या खटल्यात दोषी धरता येणार नाही, असा दावा करताना ॲॅड. पिंगळे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा संदर्भ दिला. याला राहुल शेवाळे यांच्या वतीने अ‍ॅड. चित्रा साळुंखे यांनी अर्जालाच जोरदार आक्षेप घेत युक्तिवाद करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. याची दखल घेत न्यायालयाने शेवाळे यांना वेळ देत सुनावणी २० ऑक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in