शिवसेनेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल; उद्धव ठाकरे यांचा विश्वास

सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे शिवसेनेचे राजकारण नाही. जनतेला पाणी, घर, निवारा आणि रोजगार मिळवून द्यायचा आहे. गाडगेबाबांच्या दशसूत्रीप्रमाणे सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकार हवा आणि म्हणून आपल्याला सत्ता पाहिजे.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे शिवसेनेचे राजकारण नाही. जनतेला पाणी, घर, निवारा आणि रोजगार मिळवून द्यायचा आहे. गाडगेबाबांच्या दशसूत्रीप्रमाणे सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अधिकार हवा आणि म्हणून आपल्याला सत्ता पाहिजे.त्यासाठी महाराष्ट्र पुन्हा भगवा करायचा आहे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. शिवसेनेच्या नावाचा दुरुपयोग करणारे बरेच असून त्याचा निकाल लवकरच लागेल, असा विश्वासही ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवसेनेने बीड जिल्ह्यात नेमलेल्या ३९६ बुथप्रमुखांना शिवसेना भवन येथे विमा पॉलिसी आणि ओळखपत्राचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ठाकरे यांनी, मतदारयाद्यांमध्ये होणाऱ्या फेरफारांवर लक्ष ठेवून संघटन मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे शिवसेना शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ हा जुना मंत्र पुन्हा प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन केले.

बीडमध्ये यापूर्वी शिवसेनेची आणि भाजपची युती होती. तेव्हाची ही युती फार वेगळी होती, आतासारखे तेव्हा नव्हते. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमाखातर बीड जिल्ह्यातील बऱ्याच जागा आपण भाजपला सोडल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला की, बीडमधील शिवसेनेचे अस्तित्व हळूहळू कमी होत गेले. मात्र, आता पुन्हा एकदा बीड जिल्हा भगवा करण्याची संधी आपल्याला आली आहे, असे ठाकरे म्हणाले.

१७ सप्टेंबरला संभाजीनगरचा दौरा

मराठवाड्यातील प्रश्नांसाठी येत्या १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या आंदोलनात आपण स्वतः सहभागी होऊ. त्यानंतर दसऱ्याला शिवाजी पार्कवर आपली पुन्हा भेट होईल, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in