मुंबई : आपल्या भाषणाची सुरुवात ‘जमलेल्या तमाम हिंदू बांधवानो आणि भगिनींनो’ अशी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना कालच्या सभेत हिंदूंचा विसर पडला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि सनातन हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या काँगेस नेते राहुल गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मांडीला मांडी लावून ते बसले होते. खरे तर त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. उद्धव ठाकरेंना सभेत भाषणासाठी अवघ्या पाच मिनिटांचा वेळ दिला. यावरून त्यांची पत दिसली. आता त्यांच्याकडे आमदार, खासदार, शिवसेना नाही. त्यामुळे त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांना वेळ दिली, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कालच्या इंडिया आघाडीच्या सभेवरून शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. “आघाडीची रविवारची सभा म्हणजे कौटुंबिक संमेलन होते. जम्मू काश्मीर, बिहारमधून तडीपार झालेले लोक एकत्र जमले होते. ज्यांना जनतेने दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी तडीपार केले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना कसे काय तडीपार करू शकतात? सभेत जमलेल्या नेत्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत होता. हातपाय बांधून आणल्यासारखे लोक दिसत होते,” असे शिंदे म्हणाले.
सभा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाजवळ झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या लोकांनी आधी त्या समाधीवर जाऊन माफी मागायला हवी होती. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांबरोबर, सनातन धर्माचा अवमान करणाऱ्यांबरोबर त्यांना बसावे लागत आहे, असे शिंदे म्हणाले. रविवारच्या सभेत केवळ मोदीद्वेष आणि व्यक्तीद्वेष दिसला. २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाने मोदींवर टीका केली. टीका करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. आता २०२४ च्या निवडणुकीत मतदार विरोधकांना जागा दाखवून देईल, असेही शिंदे म्हणाले.
‘शक्ती’ संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे काय?
राहुल गांधींनी आपल्या भाषणात ‘हिंदू धर्माची शक्ती’ असा उल्लख केला. हिंदू धर्माची शक्ती समाप्त करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे काय? याचे उत्तर जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत देईल. हिंदू धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही. कालच्या (रविवारच्या) सभेत सगळे हिंदूविरोधी नेते होते. एवढा मोठा राष्ट्रीय नेता, पण ठाण्यातल्या सभेला ५०० लोक सुद्धा नव्हते, अशी टीका शिंदे यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची १० वर्षे आणि महायुती सरकारची पावणेदोन वर्ष याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत जाणवेल. लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार, ४०० पार’ आणि महाराष्ट्रात आम्ही ४५ पार जाऊ, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.