जुमलेबाजीला पराभूत करण्यासाठी आघाडी ;उद्धव ठाकरे यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

देशातील जनतेला भयमुक्त करायचे आहे,’’असेही उद्धव म्हणाले
जुमलेबाजीला पराभूत करण्यासाठी आघाडी ;उद्धव ठाकरे यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा

मुंबई : ‘सबका साथ सबका विकास नाही, तर सबको लाथ मित्र का विकास’ असा प्रकार सध्या देशात सुरू आहे. जुमलेबाज हुकूमशहा उदयास आला असून त्याला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज आहे, अशा तिखट शब्दांत ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘ विरोधी पक्ष म्हणून आम्हाला संबोधले जात आहे. मात्र, आम्ही विरोधक नसून इंडिया म्हणजेच भारत आहोत. भारताचा झेंडा हातात घेतला आहे. देशाच्या विरोधात खरे कोण आहेत, ते देशवासीयांना माहीत आहे, अशी टीका करत भाजप देशविरोधी कारवाया करत असल्याचा थेट आरोपच उद्धव ठाकरे यांनी केला. भारत देश खऱ्या अर्थाने आमचा आहे. देशभरातून एकवटलेले पक्ष आमचा परिवार आहे. त्यामुळेच आम्ही आघाडीचे नाव इंडिया ठेवले आहे. इंडिया आघाडी मजबूत होत असल्याने भाजपच्या आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांच्या मनात धडकी भरली आहे. इंडियाचे हात यापुढे आणखी मजबूत करायचे आहेत. देशातील जनतेला भयमुक्त करायचे आहे,’’असेही उद्धव म्हणाले.

‘‘ दहा वर्षांत गॅसचे दर किती पटीने वाढविले, ते मोदी सरकारने आधी स्पष्ट केले पाहिजे. त्यानंतरच दोनशे रुपयांनी गॅस स्वस्त केल्यावर बोलावे, असे उद्धव म्हणाले. दहा वर्षे लूट आणि निवडणुकीच्या तोंडावर सूट’ हा जुमला आहे. अशा जुमलेबाजांना घरी बसवायचे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एका जुमलेबाज, भ्रष्टाचारी आणि हुकूमशहाचा पराजय करायचा आहे, असे सांगत यापुढे ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ असा नारा देत जनतेची लढाई आम्ही जिंकणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in