
मुंबई : विधानसभा निवडणुकीत ४० लाखांहून अधिक मतदार कसे वाढले, असा संशय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यक्त करत आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आपल्या परिक्षेत्रातील मतदार याद्यांची तपासणी डोळ्यात तेल घालून करा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. दरम्यान, मतचोरी म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
लोकसभेनंतर विधानसभेत ४० ते ४२ लाख मतदान आपल्या महाराष्ट्रात वाढवले, हे वाढलेले मतदार कोण आहेत ते बघा, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले. मतदान चोरी आणि ईव्हीएमवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदार वाढलेच कसे, वाढलेले
मतदार कोण याचा तपास घेण्यासाठी कामाला लागा. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीची पोलखोल केल्याने यांचे धाबे दणाणले आहेत, असा टोला ठाकरे यांनी महायुतीला लगावला.
फडणवीसांकडून प्रत्युत्तर
शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाही तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. पहिल्यांदा यांनी लक्षात घेतले पाहिजे, मोदी जिंकले २०१४ला तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य होते. देशातही काँग्रेसचे राज्य होते. पंधरा-पंधरा वर्षे काँग्रेसचे राज्य होते. त्यामुळे आपण का हरतो किंवा लोकांनी आपल्याला का नाकारले याचा अभ्यास न करता जोपर्यंत ते छाती बडवण्याचे काम करतील, तोपर्यंत ते सत्तेत येऊ शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.