उद्धव ठाकरेंचा खास माणूस बदलला; नार्वेकर यांच्याऐवजी रवींद्र म्हात्रे यांची निवड

माजी बंडखोर खासदार मोहन रावले यांनी नार्वेकर यांच्यावर जोरदार आरोप करून शिवसेना सोडली होती.
उद्धव ठाकरेंचा खास माणूस बदलला; नार्वेकर यांच्याऐवजी रवींद्र म्हात्रे  यांची निवड

माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘खास माणूस’ मिलिंद नार्वेकर यांचा पत्ता कट झाला असून, त्यांच्या जागी ठाकरे कुटुंबाला सावलीसारखे साथ देणारे अत्यंत निष्ठावंत रवींद्र म्हात्रे यांची निवड झाली आहे.

शिवसेनेत मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे ‘खास माणूस’ होते. त्यावेळी अनेक वाद निर्माण झाले. माजी नेते व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज ठाकरे, माजी बंडखोर खासदार मोहन रावले यांनी नार्वेकर यांच्यावर जोरदार आरोप करून शिवसेना सोडली होती. मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याशी आमचा संवाद तोडल्याचा आरोप या सर्व नेत्यांसह सर्वांनी केला.

२००५मध्ये रवींद्र म्हात्रे यांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना एका ज्येष्ठ महिला व तिच्या मुलीला उडवले होते. त्यात दोघींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ठाकरे कुटुंबामध्ये रवींद्र म्हात्रे यांचे वजन कमी झाले. त्यांच्यावर वेगाने गाडी चालवण्याचा गुन्हा मुंबई पोलिसांनी दाखल केला होता. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खासगी अंगरक्षक म्हणून म्हात्रे त्यांच्याकडे होते. त्यानंतर बाळासाहेबांचा विश्वास संपादन करून ते त्यांचे पीए बनले. बाळासाहेबांना पत्र, वर्तमानपत्र वाचून दाखवणे, त्यांचे टेलिफोन घेणे, त्यांना शिवसैनिकांचे संदेश पोहोचवणे आदी महत्त्वाची कामे त्यांच्याकडे होती.

नार्वेकर यांनी विश्वास गमावला

मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास गमावला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपले जुनेजाणते सहकारी रवींद्र म्हात्रे यांची पुन्हा निवड केली. कारण सध्या शिवसेना बंडखोरीच्या मोठ्या संकटातून जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्ष संघटनेत व अंतर्गत वर्तुळात मोठे बदल केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करायला पहिल्यांदा शिवसेनेने नार्वेकर यांना पाठवले होते; मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली ‘जवळीक’ यामुळे त्यांच्याबद्दल उद्धव यांना अविश्वास वाढला, असे सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या गणपतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी पोहोचले. त्यामुळे शिवसेनेच्या जुन्या नेत्यांना ही बाब खटकली. त्यातूनच नार्वेकर यांचा पत्ता कट झाला असावा, असे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in