नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर बुधवारी सकाळी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईला आले. पंतप्रधान झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्यासोबत व्यवसाय, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातील १०० हून अधिक लोकांचे शिष्टमंडळ आले आहे. गुरुवारी ‘फिनटेक’ कार्यक्रमात स्टार्मर व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र येणार असून यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा होईल.
भारत आणि ब्रिटनमधील संबंध अधिक दृढ करणे हा या भेटीचा उद्देश आहे. ‘व्हिजन २०३०’अंतर्गत भागीदारीच्या विकासावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी मुंबईत स्टार्मर यांना भेटतील. यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी यावर्षी ऑगस्टमध्ये ब्रिटनला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी स्टार्मर यांच्यासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली होती.
मुंबईत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान स्टार्मर हे कुपरेज फुटबॉल ग्राऊंडवर इंग्लिश प्रिमिअर लीगने आयोजित केलेल्या प्रदर्शनीय फुटबॉल कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. भारत व इंग्लंडदरम्यान फुटबॉलच्या क्षेत्रात क्रीडा संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. त्यानंतर स्टार्मर यांनी अंधेरीतील यशराज फिल्म स्टुडिओला भेट दिली. तेथे त्यांनी भारतीय चित्रपट निर्मात्यांची भेट घेतली. उभय देशांतील सांस्कृतिक बंध दृढ करण्यासाठी ब्रिटिश आणि भारतीय चित्रपट उद्योगांमधील भागीदारीला चालना देण्याबाबत यावेळी खेळीमेळीची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.