म्हाडाची घरे परवडेनात: दहा टक्के विजेत्यांनी घरे नाकारली

या प्रश्नाकडे म्हाडा किंवा राज्य सरकारने पाहाण्याची गरज आहे
म्हाडाची घरे परवडेनात: दहा टक्के विजेत्यांनी घरे नाकारली

मुंबर्इ: महाराष्ट्र हौसिंग अॅंड एरिया डेव्हलपमेंट प्राधिकरण अर्थात म्हाडा परवडणारी घरे म्हणून लॉटरीच्या माध्यमातून विकत असलेली घरे सर्वसामान्यांना परवडेनाशी झाली आहेत. यामुळे दहा टक्के विजेत्यांनी गेल्या महिन्यातच लॉटरीत जिंकलेली म्हाडाची घरे परत केली असल्याची आर्श्चयजनक माहिती आकडेवारीतून दिसून आली आहे.

यंदा म्हाडाच्या मुंबर्इ मंडळाने एकूण ४०८२ घरे लॉटरी माध्यामतून विक्रीस काढली होती. पैकी चार घरांना कुणी खरेदीदारच न मिळाल्याने प्रत्यक्षात ४०७८ घरांची लॉटरी काढण्यात आली. ही घरे मुंबर्इच्या विविघ ठिकाणी विखुरली आहेत. आतापर्यंत एकूण ३९८ विजेत्यांनी आपला घरांवरील दावा सोडला आहे. तर ७० जणांनी अजून मिळालेल्या घरांवर दावाच सांगितलेला नाही. सोमवार पर्यंत ३५१५ जणांना ऑफर लेटर जारी करण्यात आली आहेत. १४ ऑगस्ट रोजी या घरांची लॉटरी काढण्यात आली होती. म्हाडाने परवडणारी घरे म्हणून विकलेली घरे प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्यांसाठी न परवडणारीच ठरली आहेत. उदाहरणार्थ अंधेरीच्या डी एन नगरमधील ५५३ चौ.फूटाचा फ्लॅट अल्प उत्पन्न गटासाठी असून त्यांची किंमत १.६१ कोटी रुपये आहे. ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपये आहे तेच या घरासाठी अर्ज करु शकत होते. ज्याचे वेतन ७५ हजार असेल त्याला साडे आठ टक्के दराने ४० लाख रुपये कर्ज मिळू शकते. अशा माणसाला हे घर लागले तर त्याला १.२१ कोटी रुपये स्वत:चे उभे करावे लागतील. या व्यतिरिक्त मुद्रांक शुल्क भरावे लागेल. या प्रकरणात मुद्रांक आणि नोंदणी शुल्क मिळून सुमारे १२ लाख रुपये आणखी उभारावे लागतील. म्हणजे त्याला एकूण १.३३ कोटी रुपये स्वताचे उभे करावे लागतील. मग बॅक ४० लाखांचे कर्ज देर्इल. म्हाडाच्या मुख्य अधिकाऱ्यांना या परवडणाऱ्या घरांबाबत विचारले असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. तेव्हा आता या प्रश्नाकडे म्हाडा किंवा राज्य सरकारने पाहाण्याची गरज आहे.

logo
marathi.freepressjournal.in