अनधिकृत फेरीवाले पालिकेच्या रडारवर; अशासकीय संस्थांच्या मदतीने कारवाई होणार

अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो
 अनधिकृत फेरीवाले पालिकेच्या रडारवर; अशासकीय संस्थांच्या मदतीने कारवाई होणार

अनधिकृत फेरीवाल्यांवर अधिक जलद कारवाई करण्यासाठी आता अशासकीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. खासगी संस्थांच्या मदतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. यासाठी ‘सी’ विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी खासगी संस्थांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते फुटपाथ अडवून बसणारे अनधिकृत फेरीवाले पालिकेच्या रडारवर आले आहेत.

अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो; परंतु अनेक वेळा कारवाईसाठी मनुष्यबळ अपुरे पडते. त्यामुळे खासगी संस्थांच्या मदतीने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा प्लान पालिका प्रशासनाने तयार केला आहे. पालिकेच्या सी विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी खासगी संस्थांनी मनुष्यबळ पुरवावे, यासाठी खासगी संस्थांना आवाहन केले आहे. पालिकेच्या अटी-शर्तीनुसार संस्थांनी स्वयंसेवकांचा पुरवठा करणे बंधनकारक आहे, असे ‘सी’ विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, अटी-शर्तीचे पालन न करणे, अथवा समाधानकारक काम करत नसल्यास संबंधित संस्थेचे काम सी विभागाचे सहाय्यक आयुक्त थांबवू शकतात. ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान अतिक्रमण निर्मूलन वाहनांवर चार कंत्राटी कामगार असणार आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या या कारवाईत साप्ताहिक सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळता स्वयंसेवक पुरवणे ही संस्थेची जबाबदारी असणार असून नियुक्ती केल्यापासून पुढील तीन महिने कारवाईची मोहीम राबवली जाईल, असे अतिक्रमण निर्मूलन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in