अनधिकृत फेरीवाल्यांचे पुन्हा बस्तान; पादचाऱ्यांना चालताना करावी लागतेय कसरत

मुंबई महापालिकेने दीड-दोन महिन्यांपूर्वी फेरीवाल्यांवर सुरू केलेली धडक कारवाई मोहिम आता थंडावली असल्याचे दिसते. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसर, पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावर बस्तान मांडले आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांचे पुन्हा बस्तान; पादचाऱ्यांना चालताना करावी लागतेय कसरत
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेने दीड-दोन महिन्यांपूर्वी फेरीवाल्यांवर सुरू केलेली धडक कारवाई मोहिम आता थंडावली असल्याचे दिसते. या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसर, पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावर बस्तान मांडले आहे. रेल्वे परिसर, चौक, पथपथांवर फेरीवाल्यांनी व्यवसाय थाटल्याने नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे.

मुंबई महापालिकेने मोकळ्या जागा अडकवून बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली होती. लालबाग, परळ, अंधेरी पश्चिम येथील एसव्ही रोड, अंधेरी स्टेशन परिसर, सीडी बर्फीवाला रोड, एन दत्त अप्रोच रोड, सीएसएमटी रेल्वे परिसरातील पदपथ, कुर्ला, घाटकोपर आदी परिसरात व्यवसाय थाटणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने येथील पदपथांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र आता अनेक ठिकाणी फेरीवाले पुन्हा सक्रीय झाले आहेत. सीएसएमटी येथील रेल्वे स्थानक परिसर, दादर, परळ, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, वांद्रे आदी परिसरांत अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना या रस्त्यांवरून चालताना कसरत करावी लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in