
मुंबई : गुरुवारी १० जुलै रोजी गुरूपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास संघटनेच्या व्यासपीठावर (UNCTAD) मुंबई ग्राहक पंचायतीच्या ‘जागतिक ऑनलाइन ग्राहक तंटा निवारण’ व्यवस्थेच्या प्रस्तावाला उपस्थित सदस्य राष्ट्रांनी सर्व सहमतीने संमती दिली. जागतिक ग्राहक चळवळीतील तंटा निवारण क्षेत्रात या ऐतिहासिक निर्णयाद्वारे एक क्रांतिकारी पाऊल पुढे पडले आहे.
त्यामुळे नजीकच्या भविष्यात ग्राहकांच्या ई कॉमर्स व्यवहारातील परदेश स्थित उत्पादक, विक्रेते आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या तक्रारींचे संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखी खाली जलद गतीने, निष्पक्ष मध्यस्थांद्वारे किमान खर्चात, सहज सोप्या पद्धतीने ऑनलाइन तक्रार निवारण होणार आहे.
जुलै २०१९ मधे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार-विकास परिषदेत मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती. त्यावेळी अमेरिका, इंग्लंड आदी प्रगत राष्ट्रांनी या कल्पनेला कसून विरोध केला होता. परंतु गेली सहा वर्षे शिरीष देशपांडे यांनी प्रत्येक वार्षिक परिषदेत आणि दरम्यानच्या काळात हा विषय नेटाने लावून धरला.
गेल्या वर्षीच्या जिनिव्हा येथील वार्षिक परिषदेत अनेक सदस्य राष्ट्रांनी मुंबई ग्राहक पंचायतीची ही सूचना उचलून धरली होती. यंदाच्या जिनिव्हाच्या या पाच दिवसांच्या विशेष परिषदेच्या आधीच शिरीष देशपांडे आणि संस्थेच्या तरुण कार्यकर्त्या ॲड. पूजा जोशी-देशपांडे यांनी या विषयावर एक सविस्तर टिपण अंक्टाडला सादर केले होते.
परिणामत: यंदाच्या परिषदेत अनकॅडने अखेर स्वतःहून पुढाकार घेऊन जागतिक ऑनलाइन ग्राहक तंटा निवारण व्यवस्थेचे प्रारूप कसे असेल याचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. या प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी भारताच्या केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांना विशेष वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात या ऐतिहासिक प्रस्तावाला अनुमोदन दिले आणि उपस्थित सर्व सदस्य राष्ट्रांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले.
ग्राहक पंचायत विषयी प्रशंसोद्गार
याप्रसंगी बोलताना शिरीष देशपांडे म्हणाले,ही फक्त सुरुवात असून या प्रस्तावाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल असा सावधगिरीचा इशाराही शिरीष देशपांडे यांनी यावेळी दिला. परिषदेच्या समारोपानंतर अंक्टाडच्या सेक्रेटरी जनरल रिबेका ग्रीनस्पॅन शिरीष देशपांडे यांना भेटल्या असता मुंबई ग्राहक पंचायत गेली काही वर्षे संयुक्त राष्ट्रांत जे काम करत आहे त्याबद्दल प्रशंसोद्गार काढले.