भूमिगत मार्केटला युटिलिटीजचा अडथळा;रस्ते विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय

अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग, जागेचा अभाव, फेरीवाल्यांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी नवी दिल्लीच्या धर्तीवर भूमिगत मार्केट संकल्पना राबवण्याचे आदेश मुंबई शहराचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
भूमिगत मार्केटला युटिलिटीजचा अडथळा;रस्ते विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय
Published on

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांखाली विविध प्राधिकरणाच्या केबलचे जाळे विस्तारले आहे. रस्त्याखालील युटिलिटीजचा हानी न पोहोचता भूमिगत मार्केट कसे उभारता येईल, याचा अभ्यास करण्याची सूचना पालिकेच्या रस्ते विभागाला केली आहे. रस्ते विभागाच्या सल्ल्यानुसार भूमिगत मार्केट उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, दादर येथील खोदादाद सर्कल आणि प्लाझा सिमेनासमोरील कोतवाल उद्यानात भूमिगत मार्केट उभारणीची चाचपणी सुरू असून एक भूमिगत मार्केट उभारण्यासाठी सुमारे १०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग, जागेचा अभाव, फेरीवाल्यांना हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी नवी दिल्लीच्या धर्तीवर भूमिगत मार्केट संकल्पना राबवण्याचे आदेश मुंबई शहराचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबईत कुठे भूमिगत मार्केट उभारले जाऊ शकते, याची चाचपणी करण्यास पालिका प्रशासनानेही सुरुवात केली. मात्र भूमिगत मार्केट उभारण्यात रस्त्याखालील युटिलिटीजचा अडथळा समोर आला आहे. एमटीएनएल, महानगर गॅस, पालिकेच्या पाण्याच्या पाइपलाइन, मलनि:सारण जलवाहिनी, पर्जन्य जलवाहिनी आदी प्राधिकरणाच्या केबल व पाइपलाइन रस्त्याखाली आहेत. त्यामुळे युटिलिटीजचा हानी न पोहोचता भूमिगत मार्केट कसे करता येईल, यासाठी पालिकेच्या रस्ते विभागाला अभ्यास करण्याची सूचना पालिकेच्या मार्केट विभागाने केली आहे. रस्ते विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून रोड विभागाचे सल्लागार पॅनल याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दिल्लीतील प्रयोग मुंबईतही?

पालिका बाजार हा दिल्लीतील कॅनॉट प्लेसमध्ये असलेला एकमेव भूमिगत बाजार आहे. नवी दिल्लीच्या व्यावसायिक आणि आर्थिक केंद्रांपैकी एक आहे. हे नवी दिल्लीतील एक लोकप्रिय शॉपिंग, नाईटलाइफ आणि पर्यटन आकर्षण आहे. पालिका बाजारात ३८० स्टोअर्स आहेत. बाजार पूर्णपणे वातानुकूलित आहे. या पालिका बाजाराची स्थापना १९७० च्या उत्तरार्धात झाली आणि तेव्हापासून ते एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. दिल्लीतील भूमिगत बाजाराचे मुख्य प्रवेशद्वार सेंट्रल पार्कच्या समोर आहे आणि उजव्या बाजूला एफ ब्लॉक आहे. एका वेळी पंधरा हजार लोक सामावू शकतात एवढी या बाजाराची क्षमता आहे. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत भूमिगत मार्केट उभारण्याची हालचाल सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in