भूमिगत मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुसाट! प्रकल्पाचे ८३.५ टक्के काम फत्ते

आरे-बीकेसी पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवासी सेवेत
भूमिगत मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुसाट! प्रकल्पाचे ८३.५ टक्के काम फत्ते

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. देशातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो-३ प्रकल्पाचे ८३.५ टक्के काम फत्ते झाले आहे. आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्यातील काम ९०.४ टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत आरे-बीकेसी पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितले.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी व प्रवाशांना जलदगतीने प्रवास करता यावा, यासाठी घाटकोपर ते वर्सोवा पहिली मेट्रो धावली. कोस्टल रोड प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो रेल-३चे जाळे विस्तारले जात आहे. मेट्रो-३च्या प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर २०१६ पासून सुरुवात झाली. कोलकाता, दिल्ली व चेन्नई येथे भूमिगत मेट्रो रेल प्रवासी सेवेत आहे. मात्र भारतातील सर्वांत लांब भूमिगत रेल मुंबईतील असणार आहे. मेट्रो रेल प्रकल्पात एकूण २६ स्थानके असून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेतील पहिले स्थानक कफ परेड तर शेवटचे स्थानक आरे आहे. २६ स्थानकांपैकी आरे हे एक स्थानक जमिनीवर असून बाकी सर्व स्थानके भूमिगत असणार आहेत. विशेष म्हणजे बीकेसी ते आरे या १२.४४ किमीच्या पहिल्या टप्प्यातील ९०.४ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत आरे-बीकेसी पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. दरम्यान, बीकेसी ते कफ परेड या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८७.५ टक्के काम पूर्ण झाले असून हा टप्पा जून २०२४ मध्ये प्रवासी सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

मेट्रो-३ ही भूमिगत असून याचे तिकीट प्रवाशांच्या खिशाला परवडणारे असेल. तसेच मेट्रो-३ प्रकल्पामुळे पर्यावरणाला फायदा होणार असून दिवसाला वाहनांच्या फेऱ्यांमध्ये ६.६५ लाखांनी घट होईल. तर इंधनाचा वापरही कमी होऊन दिवसाला ३.५४ लाख लिटर इंधनाची बचत होईल. यूएनएफसीसीने नमूद केलेल्या माहितीनुसार, या मार्गिकेमुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. मेट्रो-३ ज्या भागातून मार्गक्रमण करणार, त्या भागातील रस्त्यावरील रहदारीत ३५ टक्के घट होईल.

मेट्रो ३ प्रकल्प वेगात!

मेट्रो-३ प्रकल्पाचे एकंदरीत स्थापत्य काम ९४.३ टक्के तर स्थानकांचे एकूण बांधकाम ९१.६ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच प्रकल्प प्रणालीचे ५६.२ टक्के, ट्रॅकचे ६७.१ टक्के आणि डेपोचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे.

जाहिरातीचे ५ वर्षांसाठी अधिकार!

मेट्रो-३ च्या पाच स्थानकांचे सेमी नेमिंग अधिकार ५ वर्षांसाठी विविध कंपन्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये कोटक महिंद्रा, एलआयसी, आयसीआयसीआय या कंपन्यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित स्थानकांच्या सेमी नेमिंग अधिकारासंबंधी निविदा प्रक्रिया सुरू आहे.

मेट्रो रेल स्थानकात प्रवासी सुविधा!

सरकते जिने (एस्कलेटर), उद्वाहक (लिफ्ट), प्लॅटफॉर्म स्क्रिन दरवाजे आणि प्रवासी माहिती डिस्प्लेची सुविधा, दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअरसाठी आरक्षित जागा, स्वच्छतागृह, विशेष म्हणजे महिलांसह प्रथमच पुरुषांच्या स्वच्छतागृहांत लहान बाळांसाठी डायपर बदलण्याची सोय, स्थानकांवरील गर्दीच्या वेळी आवश्यकतेनुसार तेथील एअर कडिंशन (हवेची स्थिती) आणि दिव्यांच्या उपलब्धतेत बदल या सोयीसुविधा उपलब्ध असतील.

उपनगरीय रेल्वे स्थानकांशी अंतर्गत जोडणी!

चर्चगेट मेट्रो स्थानक - चर्चगेट पश्चिम रेल्वे स्थानक

सीएसएमटी मेट्रो स्थानक - सीएसएमटी मध्य व हार्बर रेल्वे स्थानक, ग्रँट रोड मेट्रो स्थानक - ग्रँट रोड पश्चिम रेल्वे स्थानक, मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानक - मुंबई सेंट्रल पश्चिम रेल्वे स्थानक आणि एसटी बस डेपो

महालक्ष्मी मेट्रो स्थानक - महालक्ष्मी मोनोरेल स्थानक

दादर मेट्रो स्थानक - दादर पश्चिम रेल्वे स्थानक

बीकेसी मेट्रो स्थानक - मेट्रो मार्ग-२बी (डी. एन. नगर - मंडाले), मरोळ नाका - मेट्रो मार्ग-१ (घाटकोपर ते वर्सोवा)

३१ ट्रेन धावणार!

मेट्रो-३ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासी सेवेत ३१ ट्रेन चालवण्यात येणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ९ गाड्या लागणार असून ६ गाड्या दाखल झाल्या आहेत. तर उर्वरित ३ गाड्या लवकरच ताफ्यात दाखल होतील.

एकूण खर्च!

मेट्रो ३ प्रकल्पाचा एकूण खर्च ३७,२७५ कोटी रुपये इतका आहे.

logo
marathi.freepressjournal.in