अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांवर छापेमारी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांवर छापेमारी

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी संबंधित मुंबईतील २० हून अधिक ठिकाणांवर सोमवारी ‘एनआयए’ने छापे टाकले. दाऊदचे चेले छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांपर्यंत एनआयएच्या कारवाईची व्याप्ती आहे. या कारवाईबाबत एनआयएने सध्या तरी कमालीची गुप्तता बाळगली आहे.

एनआयएने सोमवारी बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, भेंडी बाजार, गोरेगाव, परळ, मुंब्रा आणि कोल्हापूर येथील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईतील काही तस्कर, हवाला ऑपरेटर, रिअल इस्टेट व्यापारी यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. या सर्वांचे कनेक्शन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि फरारी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारच्या कारवाईत एनआयएने छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुट्सला २००६ मध्ये युएईमधून भारतात पाठवण्यात आले होते आणि २०१० पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रूटशिवाय दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा प्लस पारकर यांचेही जबाब नोंदवले जाऊ शकतात.

दाऊद कंपनीविरुद्ध

फेब्रुवारीत गुन्हा दाखल

फेब्रुवारीमध्ये गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीविरुद्ध बेकायदेशीर वसुलीचा गुन्हा दाखल केला होता. सध्याची छापेमारी त्याच प्रकरणी सुरू आहे, असे एएनआयतर्फे सांगण्यात आले. हे गुंड खंडणीचा पैसा देशविरोधी कामांसाठी वापरतात, असा आरोप आहे. एनआयएने याप्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजेच ‘यूएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आणखी ८७ जण रडारवर

टेरर फंडिंग व अन्य देशविरोधी कारवायांप्रकरणी आणखी ८७ जण एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनआयएकडून आणखी काही जणांवर धाडी पडण्याची शक्यता आहे.

दाऊदचा आता आर्थिक

स्फोट घडवण्याचा कट

आखाती देशात दाऊदच्या कोणत्या गुन्ह्याची दखल घेतली जात नाही उलट त्याला सहकार्य केले जाते. मात्र, आता देशात असलेल्या मोदी सरकारने दाऊदची चांगलीच नाकाबंदी केली आहे. यामुळे त्याच्या दहशतवादी कारवाया एकाएकी बंद झाल्या आहेत. त्यामुळे दाऊदने आता आर्थिक स्फोट घडवून आणण्याचा कट रचल्याचे एनआयएच्या कारवाईवरुन स्पष्ट होत आहे. याप्रकरणी सलीम फ्रूट, प्रतिष्ठीत व्यक्ती सुहेल खंडवानी आणि व्यावसायिक समीर हिंगोरा यांना एनआयएने चौकशीकरिता ताब्यात घेतल्याने हा संशय खरा ठरतोय का? अशी हा चर्चा आता जोर धरू लागली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in