अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पोलीस शिपायाचा मृत्यू; वाहनचालक पसार

अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, पोलीस शिपायाचा मृत्यू; वाहनचालक पसार
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : अज्ञात वाहनाच्या धडकेने धनराज भगवान घाग (२५) या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोविंदकुपू स्वामी अनामालू हे काळाचौकी येथे राहतात. कल्पेश हा त्यांचा मुलगा असून बुधवारी रात्री उशिरा तो त्याचा मित्र धनराज घागसोबत त्यांच्या दुचाकीवरून जात होता. ही दुचाकी परळ येथील एल्फिन्स्टन ब्रिजवरून जात असताना अचानक एका भरवेगात जाणाऱ्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात कल्पेश आणि धनराज हे जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असताना धनराज घाग याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोविंदकुपू यांच्या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

धनराज हा मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून काम करत होता. सध्या त्याची नेमणूक ‘ल’ विभागात होती. तो काळाचौकी येथील आंबेवाडी, जी. डी आंबेकर मार्ग, मंगलाप्रसाद चाळीत त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. त्याचा मृतदेह त्याचा चुलत भाऊ किरण दिगंबर घाग याच्याकडे सोपवला आहे. किरण हाही पोलीस खात्यात कार्यरत असून सध्या तो एमआरए मार्ग पोलीस ठण्यात पोलीस हवालदार म्हणून काम करतो. धनराज घाग याच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in