मुंबई : यंदाच्या मनपा निवडणुकीत राज्यात ‘बिनविरोध’ उमेदवार विक्रमी संख्येने निवडून आले आहेत. जे उमेदवार ‘बिनविरोध’ निवडून आले, त्यांना स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात मनसे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी तातडीने सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून जे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्या निवडीला स्थगिती देण्यात यावी. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोवर ही स्थगिती कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्या आली आहे.
जाधव यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात बुधवारी सकाळीच सुनावणी होणार आहे. प्रचार संपल्यानंतर या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने मनसेचे म्हणणे मान्य केले, तर सर्व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या निवडीवर स्थगिती येऊ शकते. दरम्यान, मनसेकडून दुबार मतदारांची यादी फोटोसहीत तयार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
बिनविरोध उमेदवारांच्या या चार गोष्टी तपासल्या जाणार - वाघमारे
“जो उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्या उमेदवाराने इतर उमेदवारांवर काही दबाव आणला होता का? ज्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्यांच्यावर काही दबाव होता का? किंवा त्यांना काही आमिष दाखवले होते का? जर असे काही झाले असेल तर पोलिसांत तक्रार दिली होती का? याबाबत आणखी कोणाच्या काही तक्रारी आहेत का? ज्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली, त्याने स्वखुशीने माघार घेतली का? याबाबतचा अहवाल आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून मागवले आहेत. तो अहवाल आल्यानंतर आम्ही बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत पुढील निर्णय घेणार आहोत, अशी माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.