बिनविरोधचा वाद हायकोर्टात; मनसे, काँग्रेसने थेट उच्च न्यायालयाचे दार ठोठावले; ६७ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीला आव्हान

बिनविरोध निवडीचा वाद आता हायकोर्टात पोहोचला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी यासंदर्भात थेट हायकोर्टाचे दार ठोठावत रिट याचिका दाखल केल्या आहेत.
मुंबई हायकोर्ट
मुंबई हायकोर्ट
Published on

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सध्या ईव्हीएम, मतचोरीचा मुद्दा बाजूला सारला गेला असून उमेदवारांच्या बिनविरोध निवडीने विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच बिनविरोध निवडीचा वाद आता हायकोर्टात पोहोचला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी यासंदर्भात थेट हायकोर्टाचे दार ठोठावत रिट याचिका दाखल केल्या आहेत. बिनविरोध निवड जाहीर केलेल्या प्रभागांतील अर्ज मागे घेण्याच्या संशयास्पद प्रक्रियेची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला द्या, अशी विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षातच्या ६७ नगरसेवक बिनविरोध निवडीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्याच्या अनेक महापालिकांच्या क्षेत्रात उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी बेकायदेशीर कृत्यांचा अवलंब करण्यात आला आहे. राजकीय दबाव, धमकी आणि पैशांचे वाटप करून विरोधी उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले आहे, असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत सत्ताधारी पक्षाचे मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. जाधव आणि गांधी यांच्यावतीने अॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

ज्या ठिकाणी संशयास्पदरित्या उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तेथील परिस्थितीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, त्या चौकशीवर उच्च न्यायालयाची देखरेख असावी, बिनविरोध निवडीसाठी विशिष्ट मतसंख्या निश्चित करत सरकारने कायद्यात आवश्यक ती सुधारणा करावी, तसेच कथित बिनविरोध निवडणूक घोळाची स्वतंत्ररित्या सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रभागांतील निवडणुकीच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी, अशा विविध मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत. या सर्व उमेदवारांच्या निवडीमागे सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव, धमकी कारणीभूत असल्याचा दावा याचिकेत केला आहे. या प्रकरणात उच्च न्यायालय कोणता निर्णय देतेय, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध

राज्यात २९ महापालिका निवडणुकांमध्ये ६७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक २२ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यात भाजपच्या १५ आणि शिवसेनेच्या ७ उमेदवारांचा समावेश आहे. जळगावमध्ये १२ जण बिनविरोध निवडून आले आहेत, त्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रत्येकी ६ उमेदवार आहेत. भिवंडीत भाजपचे ६, तर शिवसेनेचे २, असे ८ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तसेच ठाण्यात शिवसनेचे ७, पनवेलमध्ये भाजपचे ६ तर अपक्ष १ असे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. अहिल्यानगरमध्ये भाजपचे ३, तर राष्ट्रवादीचे २ असे पाच उमेदवार विजयी झाले, तर धुळ्यात भाजपचे ४ उमेदवार विजयी झालेत. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in