राज्यात अवकाळीचा कहर वीज कोसळून ठाण्यात इमारतीला आग; पालघरमध्ये एकाचा मृत्यू

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच, राज्यातील नागरिकांची रविवारची सकाळ मात्र हलक्या पावसाने झाली.
राज्यात अवकाळीचा कहर वीज कोसळून ठाण्यात इमारतीला आग; पालघरमध्ये एकाचा मृत्यू

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची प्रतीक्षा लागून राहिली असतानाच, राज्यातील नागरिकांची रविवारची सकाळ मात्र हलक्या पावसाने झाली. मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून नाशिकमध्ये गारपीट झाल्याने द्राक्ष आणि कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे ठाण्यात एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली असून पालघरमध्ये एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

हवामान विभागाने राज्यात अनेक शहरांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर निघालेल्या तसेच मॉर्निंगवॉकला निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत गेल्या २४ तासांत ९.२ मिमी पावसाची नोंद झाली. सांताक्रुझमध्ये गेल्या २४ तासांत ५.२ मिमी पाऊस झाला.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. ठाण्यात रविवारी वीज कोसळल्याने एका इमारतीला आग लागली. ठाण्याच्या भिवंडी शहरातील काल्हेर येथील दुर्गेश पार्क येथील एका इमारतीवर रविवारी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास वीज कोसळली. त्यानंतर इमारतीवर असलेल्या प्लास्टिकमुळे इमारतीला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही क्षणात अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांत रविवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली, तर चांदवड, निफाड आणि मनमाडमध्ये जोरदार गारपीट झाली. गारपिटीचा तडाखा बसल्याने कांदा, द्राक्ष आदी पिके संकटात सापडली आहेत.

आणखी दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा यलो अलर्ट असणार आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वारे सक्रिय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहेत. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर विदर्भातील अकोला आणि बुलढाण्यातदेखील सोमवारी आणि मंगळवारी विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रस्ता अपघातात एकाचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एका व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. याप्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in