केवायसी अपडेट करणे व्यावसायिकाला महागात

मॅनेजरने बँकेत जाऊन त्यांच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटची पाहणी केली होती
केवायसी अपडेट करणे व्यावसायिकाला महागात
Published on

मुंबई : वांद्रे येथे राहणाऱ्या एका ६६ वर्षांच्या व्यावसायिकाची अज्ञात सायबर ठगाने ८ लाख २९ हजारांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरू केला आहे. या सायबर ठगाच्या सांगण्यावरून ऑनलाईन केवायसी अपडेट करणे तक्रारदार व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. ६६ वर्षांचे तक्रारदार वांद्रे येथे त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत असून, त्यांना अज्ञात मोबाईलवरून एका व्यक्तीने फोन केला होता. या व्यक्तीने तो त्यांच्या बँकेतून बोलत असून, त्यांच्या बँक खात्याचे केवायसी अपडेट नसून ते अपडेट करा, असे सांगितले होते; मात्र ते कामात असल्याने त्यांनी त्याला सायंकाळी फोन करण्यास सांगितले.

सायंकाळी सहा वाजता पुन्हा संबंधित व्यक्तीने त्यांना फोन करून त्यांना त्यांच्या मोबाईलवर बँकेचे नेट बँकिंग अॅप डाऊनलोड करण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर तो सांगत असलेली माहिती त्यांनी अपडेट केली. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी पुण्यातील त्यांच्या मॅनेजरला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या मॅनेजरने बँकेत जाऊन त्यांच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटची पाहणी केली होती. त्यात त्यांच्या खात्यातून ८ लाख २९ हजार ७४७ रुपये डेबिट झाल्याचे दिसून आले.

logo
marathi.freepressjournal.in