
अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदच्या (Urfi Javed Controversy) तोकड्या कपड्यांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आणि हा वाद चांगलाच पेटला. चित्रा वाघ यांनी याबद्दल पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा वाद आणखी चिघळला. यावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनीदेखील याबद्दल आपले मत व्यक्त केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतेच त्यांचे गाणे प्रदर्शित झाले. यावेळी त्यांना याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या की, 'सार्वजनिक ठिकाणी तिने संस्कृतीप्रमाणे वागले पाहिजे, मात्र एक स्त्री म्हणून विचार केला तर ती स्वतःसाठीच काहीतरी करत असेल तर त्यात मला काही वावगे वाटत नाही."
अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या की, "प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले. तशी त्यांनी कारवाई केली. उर्फीची व्यवसायिक गरज जर तशी असेल तर तिथे हा प्रश्न येत नाही. पण, व्यवसायिक गरज नसताना, ती आपल्या संस्कृतीप्रमाणे राहिली तर चांगले आहे. माझे वैयक्तिक मत मांडायचे झाले तर, उर्फी एक स्त्री आहे. ती जे काही करते आहे ते ती स्वतःसाठीच करते आहे. त्यामध्ये मला काहीही वावगे वाटत नाही." पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपले मत मांडले.