Urfi Javed : माझ्यावर हल्ला होऊ शकतो, उर्फी जावेदची तक्रार; महिला आयोगाचे पोलिसांना 'हे' आदेश

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उर्फी जावेदने (Urfi Javed) केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश दिले
Urfi Javed : माझ्यावर हल्ला होऊ शकतो, उर्फी जावेदची तक्रार; महिला आयोगाचे पोलिसांना 'हे' आदेश

गेले काही दिवस उर्फी जावेदच्या (Urfi Javed) वेषभूषेवरून राज्यात मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. आधी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदच्या वेषभूषेवरून आक्षेप घेतला. त्यावर उर्फी जावेदनेही त्यांना उत्तर दिले. यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या वादामध्ये उडी घेतली. त्यानंतर चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले. आता हा वाद आणखी चिघळणार असल्याचे चित्र समोर आले आहे. कारण, काही दिवसांपूर्वी मॉडेल उर्फी जावेदने रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. त्यावरून आता महिला आयोगाने उर्फी जावेद प्रकरणी थेट मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

संबंधित पत्रामध्ये लिहिले आहे की, उर्फी जावेदने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. महिला आयोगाकडे उर्फी जावेदने यांसदर्भात तक्रार दाखल केली. राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मला मारहाणीच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता उर्फी जावेदने व्यक्त केली आहे. 'मी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करते, माझे राहणीमान आणि दिसणे व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे,' असे उर्फी जावेदने तक्रारीत म्हटले आहे.

"भारतीय राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा हक्क दिला आहे. पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर त्वरित कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा." असे आदेश राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. ट्विट करून यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in