उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्तीला ED चे समन्स
मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला तसेच अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार मिमी चक्रवर्ती यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
‘१एक्सबेट’ या बेकायदेशीर सट्टेबाजी ॲॅप प्रकरणात मिमी चक्रवर्तीला १५ सप्टेंबर रोजी आणि उर्वशी रौतेलाला १६ सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. आता दोघींनाही ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहावे लागणार आहे. ‘पीएमएलए’ कायद्यांतर्गत या दोन्ही अभिनेत्रींचे जबाब नोंदवले जातील. चौकशीदरम्यान त्यांचा ‘१एक्सबेट’ या बेकायदेशीर सट्टेबाजी ॲॅपशी काय संबंध आहे, हे तपासले जाईल.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्ती यांना ‘१एक्सबेट’ ॲॅपच्या जाहिरातीसंदर्भात झालेल्या देवाणघेवाणसंदर्भात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. ईडीला या दोघींची चौकशी करून त्यांना या सट्टेबाजी करणाऱ्या मोबाईल ॲॅपच्या प्रसिद्धीसाठी पैसे कसे आणि केव्हा मिळाले? याची चौकशी करावयाची आहे.