
विक्रांत झा/मुंबई
शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात (एफवायजेसी) प्रवेश घेताना बनावट कागदपत्रे सादर करून विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविल्याचा प्रकार मुंबईतील सोमय्या विद्याविहार शिक्षण संस्थेत नुकताच उघडकीस आला आहे. यासंदर्भात संस्थेच्या प्रशासनाने केलेल्या चौकशीत बनावट कागदपत्रे आढळून आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत.
सोमय्या शिक्षण संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या एस के सोमय्या विद्यामंदिर सेकंडरी ॲण्ड ज्युनियर कॉलेज, के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स आणि के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स या तीनही शैक्षणिक संस्थांमध्ये बनावट कागदपत्रांचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.
प्रथम वर्षाची (एफवायजेसी) प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे अर्ज व कागपत्रांची तपासणी केली जात असताना हा प्रकार उघडकीस आला. काही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांमध्ये तफावत दिसून आल्याने संशय आला. त्यामुळे तपासणी केली असता अनेक प्रकार उघडकीस आले. या गैरप्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित विभागाच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला. त्यानंतर शिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने तातडीने पावले उचलत संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवशे तत्काळ रद्द करण्यात आले, असे सोमय्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, प्रवशे रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही गैरप्रकाराबद्दल तसेच त्यांच्या मुलाचा प्रवेश रद्द करण्यात आल्याबाबत कळविण्यात आले असल्याचेही सोमय्या महाविद्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. यामुळे पालकांमध्ये मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतेचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नेमक्या किती विद्यार्थ्यांचा प्रवशे रद्द करण्यात आला आहे, याची माहिती सोमय्या प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.