मुंबई : पूर्व मुक्त मार्ग मजबूत करण्यासाठी ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या मार्गावरील दोन्ही बाजूच्या रस्त्यांवर ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञानाचा उपयोग करुन डांबराचे नवीन व मजबूत आवरण करण्यात येत आहे. पैकी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरील ९ किलोमीटर अंतराचे ‘मायक्रो सरफेसिंग’ पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरील सुमारे दीड किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे रस्ता मजबूत आणि रस्त्याचे आयुर्मान वाढते. तसेच रस्त्याच्या दुभाजकांना रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये रोपे व हिरवळ लागवड करणे, संरक्षक भिंतींची रंगरंगोटी ही कामे करण्यात येत आहेत.
महानगरपालिकेकडे पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे) देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा रस्ता महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला होता. हस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर या अत्यंत महत्त्वाच्या तसेच सातत्याने वर्दळ असलेल्या रस्त्याची योग्य देखभाल आणि दुरूस्ती करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनखाली रस्ते व वाहतूक विभागाने कामे हाती घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने, या डांबरी रस्त्याचे आयुर्मान वाढवण्याच्या दृष्टिने ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबईत पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. त्याचप्रमाणे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार पूर्व मुक्त मार्गावर धूळमुक्तीच्या दृष्टीने रस्ते स्वच्छ करून पाण्याने धुणे, कडेला कोठेही कचरा व राडारोडा आढळल्यास तो हटवणे इत्यादी कामे देखील सुरू आहेत.
पारंपरिक रस्ता पृष्ठीकरण करताना, रस्त्यावरील डांबराचा संपूर्ण (सुमारे ६ इंच) थर काढून पूर्ण नवीन थर टाकला जातो. तर, ‘मायक्रो सरफेसिंग’मध्ये डांबराचा रस्ता खराब होवू नये, म्हणून त्यावर सुमारे ६ ते ८ मिलीमीटरचे मजबूत असे आवरण केले जाते, हा मुख्य फरक आहे. मायक्रो सरफेसिंगद्वारे एका दिवसात सरासरी १ किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे शक्य होते. यामध्ये, बाइंडर, सिमेंट, इमल्शन, पाणी, खडी आदींचे योग्य मिश्रण मशीनच्या सहाय्याने तयार करुन, संयंत्रांच्या सहाय्याने रस्त्यावर टाकण्यात येते. त्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक पूर्ववत सुरू करणे शक्य होते.
गळती रोखली
पूर्व मुक्त मार्गावर चेंबूर आणि पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने असलेल्या बोगद्याच्या आतमध्ये पाणी गळतीच्या समस्येमुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. त्यामुळे ही गळती रोखण्यासाठीच्या कामाचे कार्यादेश महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत देण्यात आले होते. बोगद्यात सुमारे २०० ते २५० मीटर अंतरापर्यंत पाणी गळती होत असल्याने काही ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावरही परिणाम झाला होता. त्यामुळे चेंबूर दिशेने तसेच पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने दोन्ही बाजुला पाणी गळती रोखण्यासाठीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये वॉटर प्रूफिंग, ग्राऊटिंग, प्लम्बिंग यासारखी कामे समाविष्ट होती.