भाजपकडून मतांसाठी राम मंदिराचा वापर! शरद पवार यांची टीका: राजीव गांधींच्या कार्यकाळातच मंदिराचा शिलान्यास

कर्नाटकातील निपाणी येथे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘‘अयोध्येचा जय श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे.
भाजपकडून मतांसाठी राम मंदिराचा वापर! शरद पवार यांची टीका: राजीव गांधींच्या कार्यकाळातच मंदिराचा शिलान्यास

विशेष प्रतिनीधी/मुंबई : अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिराचा शिलान्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाला. मग काही लोक कोर्टात गेले. आता निर्णय आला. मंदिर निर्माण होत आहे. पण, रामाच्या नावाचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राजकारणासाठी होत आहे. धार्मिकतेच्या राजकारणाचा वापर आज अधिक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० दिवस उपवास करणार आहेत. त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. पण, गरिबी हटवण्यासाठी त्यांनी काही केले असते तर बरे झाले असते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी हाणला.

कर्नाटकातील निपाणी येथे बोलताना शरद पवार म्हणाले, ‘‘अयोध्येचा जय श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. इथली मशीद पडल्यानंतर इथे राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या काळात झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यासही झाला. राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत.’’

शरद पवार म्हणाले, ‘‘या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण, शेतकऱ्यांची कर्जं माफ होत नाहीत. देशात चुकीची आर्थिक धोरणं राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणे घेणाऱ्या लोकांना बाजूला केले पाहिजे. कर्नाटक राज्यातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा आहे. धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’

गरीबांसाठी उपवास करावा!

शरद पवार म्हणाले, ‘‘राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का. मोदी राम मंदिरासाठी १० दिवस उपवास करत आहेत, तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा, असा चिमटादेखील शरद पवारांनी मोदींना काढला आहे.

logo
marathi.freepressjournal.in