पाणी जपून वापरा! ; पवई येथे १३० वर्षं जुनी पाईपलाईन फुटली

पवई येथे शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास १३० वर्षं जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्याने फुटली आहे.‌
पाणी जपून वापरा! ; पवई येथे १३० वर्षं जुनी पाईपलाईन फुटली
Published on

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून, शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास पवई येथे १३० वर्षं जुनी जलवाहिनी जीर्ण झाल्याने फुटली आहे.‌ त्यामुळे अंधेरी पूर्व भागात काही ठिकाणी व धारावी परिसरातील काही भागांत शनिवारी संध्याकाळी पाणीपुरवठा राहणार आहे. पालिकेच्या जल विभागाने युद्धपातळीवर काम हाती घेतले असून, रात्री उशिरापर्यंत काम करण्याचा प्रयत्न असल्याचे जल विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटून गळती होत असल्याचे प्रकार घडत आहेत. शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास तानसा जलवाहिनी फुटली आणि पाणी गळती सुरू झाली. ही गळती दुरुस्ती शनिवार रात्री उशिरापर्यंत पूर्ण होईल आणि अंधेरी पूर्व व धारावीतील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले.

भांडुप ते पवई दरम्यान तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे, तर पवई ते मरोळ दरम्यान या १३० वर्षं जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती व पाईप बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पवई ते मरोळ दरम्यान काम सुरू असताना जलवाहिनी फुटली आहे. रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होईल आणि दोन्ही ठिकाणचा पाणीपुरवठा आज (रविवारी) सुरळीत होईल, अशी माहिती माळवदे यांनी दिली.

पाणी जपून व काटकसरीने वापरावे व पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in