प्रवाशांना दिलासा; UTS ॲपमध्ये झाला 'हा' बदल

यूटीएस ॲपद्वारे लोकल तिकिटासाठी रेल्वे परिसरापासून २० किमी आणि एक्स्प्रेस गाडीचे तिकीट घेण्याचे अंतर ५० किमी मर्यादा होती. आता...
प्रवाशांना दिलासा; UTS ॲपमध्ये झाला 'हा' बदल
Published on

मुंबई : अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲपद्वारे तिकीट घेण्यासाठी निर्धारित केलेली बाह्य अंतर मर्यादा रेल्वे मंत्रालयाने हटवली आहे. या निर्णयानुसार युटीएस ॲपवरून प्रवाशांना कोणत्याही ठिकाणावरून तिकीट घेता येणार आहे. अंतराची मर्यादा हटविल्याने आता लोकल आणि एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना घरबसल्या पेपरलेस रेल्वे तिकीट घेता येणार आहे.

लोकल आणि एक्सप्रेस प्रवाशांना तिकिटासाठी तासंतास तिकीट खिडक्यांवर रांगेमध्ये तिष्ठत उभे राहावे लागत असे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित तिकीट प्रणाली (यूटीएस) ॲपद्वारे तिकीट घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. रेल्वे स्थानकाजवळून तिकीट घेण्याच्या या प्रणालीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. मोबाइल ॲप द्वारे तिकीट मिळत असल्याने या सुविधेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे हळूहळू तिकीट घेण्याच्या अंतराची मर्यादा वाढविण्यात आली.

यूटीएस ॲपद्वारे लोकल तिकिटासाठी रेल्वे परिसरापासून २० किमी आणि एक्स्प्रेस गाडीचे तिकीट घेण्याचे अंतर ५० किमी मर्यादा होती. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने आता युटीएस मोबाइल ॲपवरील जिओ-फेन्सिंग च्या निर्बंधांची मर्यादा काढून टाकली आहे.

तिकीट बुकिंगची मर्यादा हटवल्यानंतर प्रवासी घरी बसून कोणत्याही ठिकाणाहून प्रवासाचे तिकीट बुक करू शकणार आहेत; मात्र प्रवाशांनी तिकीट आरक्षित केल्यापासून एक तासाच्या आत आणि उपनगरी नसलेल्या गाड्यांच्या तीन तासांच्या आत उपनगरीय स्त्रोत स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in