
मुंबई : उत्तन–विरार सागरी सेतू (यूव्हीएसएल) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फत सुरू आहे. प्रकल्पातील भूसंपादनातील अडचणी कमी करण्यासाठी, विद्यमान पायाभूत सुविधा अधिक जोडण्यासाठी आणि निवासी व औद्योगिक भागांना ॲक्सेस देणारे रॅम्प समाविष्ट करण्यासाठी कॉरिडॉरचे नव्याने नियोजन आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वर्सोवा–विरार सागरी सेतू (व्हीव्हीएसएल) प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. मात्र, ऑक्टोबर २०२२ मध्ये हा प्रकल्प एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन टप्प्यांमध्ये प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे निशित झाले. एमएमआरडीएने टप्पा- १च्या (उत्तन-विरार) अंमलबजावणीसाठी मंजुरी दिली असून टप्पा-२ बाबत (विरार-पालघर) व्यवहार्यता अभ्यास करण्यात येत आहे. वर्सोवा ते उत्तन हा भाग मुंबई महानगरपालिकेच्या उत्तर सागरीकिनारा मार्ग प्रकल्पात समाविष्ट असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे.
टप्पा-१ चा तांत्रिक तपशील
यूव्हीएसएल टप्पा-१ची एकूण लांबी (सागरी सेतू आणि जोडरस्त्यांसह) ५५.१२ किमी असून यात पुढील जोडरस्त्याचा समावेश आहे.
- उत्तन ते विरार सागरी सेतू : २४.३५ किमी
- उत्तन जोडरस्ता : ९.३२ किमी
- वसई जोडरस्ता : २.५ किमी
- विरार जोडरस्ता : १८.९५ किमी
सुधारित प्रकल्पात या संरचनात्मक बदलांचा समावेश
- संरचनात्मक रचना आणि बांधकाम
- बोगदे व उत्तन रस्ता सुधारणे
- उत्तन व विरार जोडरस्त्यांचे पुनःसंरेखन
- आयटीएस व सुरक्षितता प्रणालींचा समावेश