
एमडी आणि हेरॉईन ड्रग्ज तस्करीप्रकरणी उत्तर प्रदेशच्या एका पोलीस शिपायासह त्याच्या सहकाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली. अमितकुमार सहन्सरपाल सिंह आणि हर्मेशकुमार ऊर्फ मनोहर महेंद्र सिंग अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमितकुमार हा उत्तर प्रदेशच्या हापूड पोलीसलाईन ठाण्याचा शिपाई असल्याचे असून २३ एप्रिलला मालवणी पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत घालताना त्यांना दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ३३५ ग्रॅम वजनाचे डबल टायगर हेरॉईन आणि दहा ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत १ कोटी ७० लाख रुपये होती. ड्रग्ज तस्करीप्रकरणी या दोघांविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.
तपासात त्यांनी ते ड्रग्ज त्यांना अमितकुमार सिंह याने दिल्याचे उघडकीस आले. अमितकुमार हा उत्तर प्रदेश दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याने त्याच्या अटकेसाठी एक विशेष पथक उत्तर प्रदेशला गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अमितकुमारला त्याच्या मुझफ्फरनगर, सिसॉलीच्या करबामधील राहत्या घरातून अटक केली. अटकेनंतर त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.