रिक्त पदे, कामाचा ताण कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी, नायर दंत रुग्णालयात १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलन

मुंबई महापालिकेच्या नायर दंत रूग्णालयात चतुर्थ श्रेणीच्या १३९ पदे असून यापैकी ७९ पदे भरण्यात आली
रिक्त पदे, कामाचा ताण कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी, नायर दंत रुग्णालयात १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलन

चतुर्थी श्रेणी कामगारांची ४० टक्के रिक्त पदे, रिक्त पदांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण, कंत्राटी कामगारांना भलत्याच कामास जुंपणे यामुळे नायर दंत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ जूनपासून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या नायर दंत रूग्णालयात चतुर्थ श्रेणीच्या १३९ पदे असून यापैकी ७९ पदे भरण्यात आली आहेत. सफाई कामगार, सेवक, हमाल, कक्ष परिचारक, विद्युत विभागातील अन्य कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. १३९ पैकी अवघे ७९ पदे भरण्यात आल्याने उर्वरित कामगारांवर कामाचा प्रचंड ताण पडतो. नायर दंत रुग्णालय प्रशासनाने नुकतीच प्रशासकीय पदे भरली; मात्र चतुर्थ श्रेणीतील पदे अद्याप भरलेली नाहीत. यासाठी २४ एप्रिल ते २ मे आंदोलनही केले. तेव्हा कामगार संघटना व रूग्णालय प्रशासनात बैठकही होऊन चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले होते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, ही पदे अद्यापही भरण्यात आली नसून, कार्यरत कामगारांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. तसेच बारा कंत्राटी कामगारांचीही नियुक्ती वॉडबॉय म्हणून करण्यात आली; मात्र त्या पदाच्या कामांऐवजी दुसऱ्याच कामाची जबाबदारी त्यांना देण्यात येत असल्याने रुग्णसेवेत अडचण निर्माण होते. त्यामुळे चतुर्थ श्रेणीतील ४० टक्के रिक्त पदे भरण्यात यावी, या मागणीसाठी नायर दंत रुग्णालयातील कामगार १ जूनपासून सामूहिक नैमित्तिक रजा घेऊन उपोषण करणार असल्याचे नारकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in