रेबीजमुक्त मुंबईसाठी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण; २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत विशेष मोहीम राबवणार

भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर जीवघेण्या रोगापासून मानवाचा बचाव करण्यासाठी पल्स अँटी -रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येणार
रेबीजमुक्त मुंबईसाठी भटक्या कुत्र्यांचे लसीकरण; २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत विशेष मोहीम राबवणार

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर जीवघेण्या रोगापासून मानवाचा बचाव करण्यासाठी पल्स अँटी -रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या पाच दिवसांच्या मोहिमेत तब्बल १५ हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्ल्यूव्हीएस-एमआर) संस्थेच्या सहकार्याने शनिवार, २४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता जुहू चौपाटी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, प्राणी कल्याण संघटनांचे विविध प्रतिनिधी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर अँटी रेबीज लसीकरण मोहीम हा आणखी एक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सन २०३० पर्यंत श्वानांपासून भारताला रेबीजमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा आखला आहे. पालिकेने २०२२ मध्ये मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प हाती घेतला. रेबीज निर्मूलनासाठी पालिकेने २५ जुलै २०२३ रोजी वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज (डब्ल्यूव्हीएस-एमआर) या स्वयंसेवी संस्थेसोबत सामंजस्य करार केला. याच पार्श्वभूमीवर आता वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-मिशन रेबीज यांच्यासोबत मिळून पालिका क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई व पनवेलच्या हद्दीला लागून असलेल्या भागातील भटक्या कुत्र्यांचे पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय विभाग आणि देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.

स्थानिक फीडर्स आणि स्वयंसेवकांच्या मदतीने श्वानाला पकडणे, रेबीजची लस देणे आणि त्यांच्या कपाळावर लसीकरण झाल्याबाबत चिन्हांकित करणे, अशी ही लसीकरणाची प्रक्रिया असेल.

१० विभागांत मोहीम राबवणार!

दरम्यान, रोज सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान के (पूर्व), के (पश्चिम), एच (पूर्व), एच (पश्चिम),एल, एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, जी (उत्तर) आणि एफ (उत्तर) या १० प्रशासकीय विभागांमधील सुमारे १५ हजार भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

पशुवैद्यक, पशुवैद्यकीय परिचारिकांची टीम!

या मोहिमेत आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक, श्वान पकडणारे चमू, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी, वायओडीए, आयडीए, डब्ल्यूएसडी या स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, स्थानिक फीडर्स आणि स्वयंसेवकही सहभागी होतील. प्रत्येक चमूमध्ये वॅक्सिनेटर (पशुवैद्यक/पशुवैद्यकीय परिचारिका), हँडलर (प्रशिक्षित पशुवैद्य सहाय्यक), नेट कॅचर आणि डेटा कलेक्टर यांचा समावेश असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in