
मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी ७६ हजार २२० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्य सागरी मंडळाचा २६ टक्के सहभाग म्हणून राज्य सरकारने ३ हजार ४० कोटी रुपये खर्चाचा निधी देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाढवण बंदराच्या कामाला गती मिळणार आहे.
राज्याचा आर्थिक व औद्योगिक विकास साधण्यासाठी बंदरे क्षेत्राच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व असून जल वाहतुकीच्या माध्यमातून आयात व निर्यातीसाठी आधुनिक पायाभूत सुविधांसह बंदर प्रकल्प निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भविष्यातील गरज म्हणून जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे सॅटेलाईट पोर्ट म्हणून वाढवण तालुका डहाणू, पालघर जिल्ह्यात मोठा पोर्ट विकसित करण्यात येत आहे. वाढवण बंदर प्रकल्पाचा एकूण खर्च ७६ हजार २२० कोटी इतका असून, सदर प्रकल्प जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण व महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त भागीदारीतून मे. वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लि. या मार्फत विकसित करण्यात येत आहे.\
पालघरची ओळख जागतिक व्यापार केंद्र होणार
वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला असून पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर, भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होईल.