Palghar: 'वाढवण'विरोधी आंदोलन तीव्र; वरोर नाक्यावर महिला, मच्छीमार, शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

वाढवण बंदराच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या प्राथमिक कामांना विरोध करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी बुधवारी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र केले. टिघरेपाडा येथे बंदराच्या भरावासाठी माती आणि दगडांची वाहतूक करणारे ट्रक अडवून महिला, मच्छीमार, शेतकरी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ केला.
Palghar: 'वाढवण'विरोधी आंदोलन तीव्र; वरोर नाक्यावर महिला, मच्छीमार, शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'
Palghar: 'वाढवण'विरोधी आंदोलन तीव्र; वरोर नाक्यावर महिला, मच्छीमार, शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'
Published on: 

नितीन बोंबाडे/पालघर

वाढवण बंदराच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या प्राथमिक कामांना विरोध करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी बुधवारी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र केले. टिघरेपाडा येथे बंदराच्या भरावासाठी माती आणि दगडांची वाहतूक करणारे ट्रक अडवून महिला, मच्छीमार, शेतकरी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर पोलिसांनी सुमारे ३० ते ३५ आंदोलकांना ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ वरोर नाका येथेही चिंचणी-डहाणू महामार्ग रोखण्यात आला.

दरम्यान, आंदोलनाला आता वसई कोळीवाड्यातूनही पाठिंबा मिळत असून, आंदोलनस्थळी ठाण मांडून बसलेल्या मच्छीमारांसाठी वसईतील कोळी बांधवांनी मासळीची रसद पाठवली आहे. वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमार, शेतकरी, आदिवासी आणि भूमिपुत्रांच्या पारंपरिक उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बंदराच्या भरावाचे काम सुरू झाल्याने नाराजी

या पार्श्वभूमिवर स्थानिकांकडून सुरुवातीपासूनच प्रकल्पाला विरोध केला जात आहे. हा विरोध कायम असतानाही बंदराच्या भरावासाठी माती आणि दगडांची वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली. टिघरेपाडा परिसरातून बुधवारी सकाळी अवजड ट्रकची वाहतूक सुरू असल्याचे समजताच महिला आणि शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून हे ट्रक अडविले. यावेळी बंदरविरोधी घोषणाबाजी करत वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

पोलीस - आंदोलकांमध्ये धक्काबुक्की

आंदोलकांना हटवून वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयत्नात पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर पोलिसांनी मनसेचे धीरज गावड, प्रशांत पाटील, वाढवण बंदर संघर्ष समितीचे निखिल पाटील, विनीत पाटील, काँग्रेसच्या डहाणू तालुकाध्यक्ष वर्षा वायडा, माकपचे सुरेश जाधव यांच्यासह सुमारे ३० ते ३५ जणांना ताब्यात घेतले. त्यांना बोईसर येथील डिटेक्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आंदोलकांची तातडीने सुटका करण्याची मागणी

आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच वरोर नाका येथे नागरिकांनी एकत्र येत चिंचणी-डहाणू महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला. ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. परिस्थितीची दखल घेत पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी आंदोलकांशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलकांनी ‘रास्ता रोको’ मागे घेतल्याने वाहतूक पूर्ववत झाली.

वसई कोळीवाड्यातून ऐकतेचा संदेश

दरम्यान, वाढवण बंदरविरोधी आंदोलनाला किनारपट्टीवरील कोळीवाड्यांतून पाठिंबा मिळू लागला आहे. कफ परेड कोळीवाड्यातून सुरू झालेली अन्नधान्य संकलन मोहीम आता वसईपर्यंत पोहोचली आहे. आंदोलनस्थळी अनेक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या मच्छीमारांसाठी वसई कोळीवाड्यातील बांधवांनी मासळीची रसद पाठवली. मच्छीमारांसाठी मासळी हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्यांच्या श्रमाचे आणि जीवनपद्धतीचे प्रतीक आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना मासळी पाठवून वसईतील कोळी बांधवांनी ऐक्याचा संदेश दिला आहे.

आंदोलकांचा तीव्र आंदोलनाचा निर्धार

वाढवण बंदराविरोधातील हा संघर्ष आता एका गावापुरता किंवा एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून मुंबईपासून पालघरपर्यंतच्या किनारपट्टीवरील कोळीवाड्यांमध्ये त्याला पाठिंबा मिळत असल्याचे या उपक्रमातून दिसून येत आहे. स्थानिकांचा विरोध, माती-दगड वाहतुकीविरोधातील आंदोलन, आंदोलकांची धरपकड आणि किनारपट्टीवरील समाजघटकांकडून मिळणारा पाठिंबा यामुळे वाढवण बंदरविरोधी आंदोलन पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. प्रकल्पाच्या कामांबाबत स्थानिकांचा विरोध कायम असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)